नाशिक : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भरवीरमधील अर्जुन वाळूंज या जवानाने अरुणाचल प्रदेशमध्ये दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आता त्या प्रकरणाची लष्कराने चौकशी केली असून सर्व पुरावे गोळा केले आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे संबंधित जवानाच्या पत्नीवर आणि तिच्या माहेरच्या चार जणांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भरवीर या छोट्या गावातील अर्जुन प्रभाकर वाळूंज हा सैन्यदलात कार्यरत होता. अरुणाचलच्या टेंगा व्हॅली येथे कार्यरत असतांना 2019 साली त्याचा विवाह झाला होता. मात्र सासू-सासरे त्रास देतात असा आरोप करुन त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. हा सगळा प्रकार अर्जुनला ती सांगत असल्याने अर्जुनने पत्नीला आपल्या सोबत अरुणाचल येथे नेले. मात्र तेथेही दोघांमध्ये वाद होऊ लागले. पत्नीच्या नातेवाईकांनी अर्जुनला मानसिक त्रास देत त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. या वैवाहिक वादाचा अर्जुनला प्रचंड मानसिक त्रास होत होता. 19 ऑक्टोंबर 2019 रोजी टँगा व्हॅलीच्या लष्करी छावणीत संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह घरी आणल्यानंतर लष्करी इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


लष्करी छावणीत संशयास्पद स्थितीत आत्महत्या केल्याचे अर्जुन याच्या घरातील लोकांना लक्षात आल्यावर त्यांनी त्याच्या पत्नीच्या विरोधात सुपा पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. लष्करी सेवेतील अधिकाऱ्यांनी मग त्याच्या मृत्यूची चौकशी सुरु केली. काही पुरावे, मोबाईल मधील काही संभाषण याचा आधार घेत लष्कराचा चौकशी अहवाल असे सगळे पुरावे मिळाल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर सुपा पोलिसात अर्जुनच्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करुन घेतला. सुपा पोलीस आता याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.


अर्जून वाळूंज हा कुटुंबातील एकुलता कमविणारा व्यक्ती होता. त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ हे शेती करतात. पतीच्या निधनानंतर सैन्यदलाने त्याला मिळणाऱ्या पैशातील 80 टक्के रक्कम ही पत्नीला तर 20 टक्के रक्कम आई-वडिलांना दिली. मात्र आपल्याला 50 टक्के पैसे मिळावे अशी मागणी त्याच्या कुटुंबाने लष्करी अधिकाऱ्यांकडे केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :