नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर मंदिराला विश्वस्त मंडळ लाभले असून तब्बल अडीच वर्षानंतर विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली आहे. या मंडळासाठी जवळपास 165 हून अधिक अर्ज आले होते. यानंतर धर्मादाय उपायुक्त श्रीमती के आर सुपाते जाधव यांनी विश्वस्त आदेश जारी केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त मंडळ निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात म्हणजेच ज्यावेळी देशभरात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 2020 साली त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त मंडळ मुदत संपुष्टात आली. त्यानंतर मंदिर समितीवर धर्मादाय आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. देवस्थान ट्रस्टची विश्वस्त मंडळ निवड अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिली होती. कोरोना काळ असल्याने विश्वस्त मंडळ निवड लांबणीवर पडली.
त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये विश्वस्त पदासाठी धर्मादाय आयुक्त नाशिक यांनी अर्ज मागविले होते. त्यावेळी 187 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती देखील जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आल्या. मात्र त्या मुलाखतींचा निर्णय झाला नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी नव्याने प्रकटन जाहीर झाले. पुन्हा विश्वस्त पदासाठी अर्ज मागविले. मात्र त्यानंतर ही अर्जाची पडताळणीचा निर्णय अधांतरी पडला.
दरम्यान फेब्रुवारीत त्र्यंबकेश्वर यात्रा प्रशासकांच्या नियंत्रणाखाली संपन्न झाली. विश्वस्त पदासाठी पुन्हा नव्याने 187 इच्छुकांनी अर्ज केले. यातील सर्वांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मात्र पुन्हा कोविडचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने हा विषय बारगळला. त्यानंतर जवळपास सात ते आठ महिन्यांनी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू झाली. तीन चार दिवसांपूर्वी मुलाखत प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज विश्वस्त मंडळाची निवड अखेर करण्यात आली. जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीनंतर त्र्यंबकेश्वर मंदिराला विश्वस्त मंडळ लाभले आहे.
असे आहे विश्वस्त मंडळ
विश्वस्त मंडळासाठी 185 इच्छुकांनी यासाठी अर्ज केले होते. जवळपास 165 इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे समजते. त्यातून पुढील नऊ विश्वस्त निवडण्यात आले. नारायण मुठाळ सिन्नर तालुका, श्रीपाद कुलकर्णी नाशिक, मनोज कुमार राठी नाशिक, राहुल साळुंके नाशिक, अमर ठोंबरे तालुका चांदवड, कांचन ताई जगताप उकाडे, निलेश गाढवे देवळाली कॅम्प, गोकुळ गांगुर्डे चांदवड तालुका, सोमनाथ घोटेकर नाशिक हे नऊ विश्वस्त भाविकांमधून निवडण्यात आले आहे. यात भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी हे तीन विश्वस्त आहेत. तर पदसिद्ध विश्वस्त म्हणून त्रंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे ट्रस्टचे विश्वस्त असतात, असे तेरा विश्वस्त पाच वर्षांसाठी निवडले गेले आहे.
त्र्यंबकमधून एकही विश्वस्त नाही
दरम्यान त्र्यंबक शहरामधून अनेकांनी विश्वस्त होण्यासाठी अर्ज केलेले होते. पण त्र्यंबकच्या सामान्य नागरिकांमधून (3 पुजारी आणि 1 पदसिद्ध वगळता) विश्वस्त निवडला गेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तसेच ज्यांनी मुलाखती दिल्या होत्या, त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान एकमेव महिला विश्वस्त निवडण्यात आली आहे.