नाशिक : आईने मयत 'दाखवलेल्या' बलात्कारातील आरोपीला अखेर चार वर्षांनी जेरबंद करण्यात आलं आहे. नाशिक पोलिसांनी पेठ तालुक्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आईच्या आंधळ्या मायेमुळे आरोपी इतकी वर्ष पोलिसांना चकवा देत राहिला.
27 डिसेंबर 2014 रोजी नाशकातल्या मधुकर गांगुर्डेने 14 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याला सहा महिन्यांची कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र आरोपी जामिनावर सुटला.
तेव्हापासूनच सुनावणीला न आल्यामुळे न्यायालयाने वॉरंट बजावलं. मात्र जामिन मिळाल्यानंतर आपल्या मुलाचा मृ्त्यू झाला, असं सांगत त्याच्या आईने न्यायालयात मृत्यूचा खोटा दाखला सादर केला. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना याबाबत चौकशी करण्यास सांगितलं.
प्रत्यक्षात मधुकर जिवंत आहे, पेठ तालुक्यातील अंबापाणी गावी त्याने लग्न केलं आणि मजुरीचं काम करत तो कुटुंबासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी पहाटे अंबापाणी गाव गाठत पेठ पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या.
मधुकरला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर सेंट्रल जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. या गुन्ह्याचं दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असून खटला सुरु आहे. पुढील आदेश मिळताच पोलिस कारवाई करणार आहेत.
मुलाचा मृत्यू झाला, बलात्काराच्या आरोपीच्या आईची आंधळी माया
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
05 Jul 2018 04:30 PM (IST)
जामिन मिळाल्यानंतर आपल्या मुलाचा मृ्त्यू झाला, असं सांगत बलात्काराच्या आरोपीच्या आईने न्यायालयात मृत्यूचा खोटा दाखला सादर केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -