पुणे : सरकारने परवानगी दिली तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून येत्या 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण केले जाऊ शकतं, त्या संबंधी सर्व तयारी आमच्याकडे आहे अशी माहिती मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी दिली आहे. त्यांनी तसे एक ट्वीट केलं आहे.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी पुण्यातील कोरानाच्या लसीकरणासंबंधी आपल्या काही योजना मांडल्या आहेत. ते म्हणाले की, "कोरोनाच्या लसीकरणाचा खर्च हा आरटीपीसीआर चाचणीच्या एक चतुर्थांश आहे. आपण जर पुण्यात दर दिवशी एक लाख लोकांना कोरोनाची लस दिली तर येत्या दोन महिन्यात पुण्यातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल. पुण्यातल्या लसीकरणाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडे सर्व सुविधा उपलब्ध असून त्या संबंधी प्लॅनही तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अशी परवानगी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सला मिळाली तर ही जबाबदारी पार पाडायला आम्ही समर्थ आहोत."
सुधीर मेहता पुढे म्हणाले की, "पुण्याची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे. त्यामध्ये जवळपास 33 लाख लोकसंख्या ही 20 वर्षाच्या आतील आहे. त्यामुळे त्या वरील असणारी 42 लाख लोकसंख्येचे लसीकरण करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन असे 84 लाख कोरोनाचे डोस आवश्यक आहेत. पण आमचा अनुभव असा सांगतोय की यापैकी केवळ 60 ते 65 टक्के लोकसंख्येला सध्या कोरोनाच्या लसीची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 25 लाख लोकसंख्या आणि त्यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस इतके ध्येय साध्य झाले तरीही सर्व पुण्याचे लसीकरण होईल."
सुधीर मेहता यांनी पुण्यातील कोरोना लसीसंबंधी काही योजना मांडल्या आहेत. ते म्हणतात की या 25 लाख लोकसंख्येपैकी 10 लाख लोकसंख्या ही 40 वर्षावरील आहे आणि 15 लाख लोकसंख्या ही 20 ते 40 वर्षामधील आहे. यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस द्यायचे तर खालील तीन प्रकारे ते देता येतील.
1. दर दिवशी 25 हजार डोस असे 200 दिवस,
2. दर दिवशी 50 हजार डोस असे 100 दिवस
3. दर दिवशी 75 हजार डोस असे 70 दिवस
या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करायची झाल्यास सर्व प्रशासन आणि हॉस्पिटल्सना त्याची तयारी करवी लागेल. येत्या 100 दिवसात पुण्यातील नागरिकांचे लसीकरण करायचे असेल तर केंद्र सरकारने पुण्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस उपलब्ध करुन द्यावेत. पुण्यातल्या कोरोनाची स्थिती, आतापर्यंतचे कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू लक्षात घेता पुण्यातील कोरोनाच्या लसीकरणाचा वेग विशेष वाढवावा लागेल. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाच्या लसीकरणाचा वेग त्याहून जास्त वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे असंही ते म्हणाले.