नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत अतुल केदार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक गावात एका कृषी कंपनीने टोमॅटो वाणाच्या संदर्भात चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला सुमारे दीडेशे ते दोनशे शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना नाश्ता आणि मठ्ठा देण्यात आला होता.
नाश्ता केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना पोटात मळमळ होऊन अस्वस्थ वाटू लागलं. या शेतकऱ्यांना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेत अतुल केदार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचं पथक चौकशीसाठी दिंडोरीला रवाना झालं आहे. हे पथक अन्न प्रदार्थांचे नमुने घेणार असून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याची चौकशी करणार आहे.