नाशिक : सुलभ हप्त्यावर आजवर तुम्ही घर, गाडी, टीव्ही, फ्रीज अशा असंख्य वस्तू विकत घेतल्या असतील. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण जाहिराती तरी पाहिल्याच असतील. मात्र आता बारशापासून लग्नापर्यंत, वास्तूशांतीपासून पिंडदानापर्यंत सगळं काही ईएमआयवर!
नाशकात त्र्यंबकेश्वरमध्ये पूजापाठ करायचा असेल, तर तुम्हाला सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. अनिकेत शास्त्री महाराजांनी ही नवी ऑफर लाँच केली आहे.
शून्य डाऊन पेमेंट, व्याजही शून्य रुपये, कसलंही तारण नाही, कुठल्याही जाचक अटी नाहीत. ओळखपत्र आणि संस्थेचा फॉर्म भरला की तुमचं काम झालं म्हणून समजा. महाराजांच्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आजवर फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरुन कुठलीही वस्तू ईएमआयवर घेण्याची सोय होती. आता पूजापाठही ईएमआयवर करुन बघता येणार आहे. धार्मिक पूजेसाठी महाराजांनी ईएमआयवर पैसे भरण्याची सोय केलीय खरी, पण याचं पुण्य मात्र ईएमआयमध्ये मिळू नये इतकंच.