नाशिक : तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच ऑफलाईन शाळा (Offline School) सुरू झाल्या. शाळेचा (School)  प्रवेश दिवस कुणाचा रडत खडत तर कुणाचा हसत खेळत झाला. कुणी स्कुल व्हॅनमधून, तर कुणी बैल गाडीतून शाळेत प्रवेश केला. मात्र पेठ तालुक्यातील अनोखा शाळा प्रवेश अनुभवला. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गढई पाडा येथील चिमुकल्यांचा शाळा प्रवेश मात्र साहेबांच्या लाल दिव्याच्या गाडीतून झाल्याने मुलेही आनंदित झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी  गाडीत बसवून आणल्याने मुलेही सुखावली.


नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील प्राथमिक माध्यमिक शाळा शासनाच्या निर्देशानुसार आज सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी कुणी पालकांच्या सोबत तर कुणी स्कुल व्हॅन चालविणाऱ्या काका सोबत शाळेचा पहिला दिवस सुरू केला. यामुळे शाळेतील वातावरण प्रफुल्लित झालेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे कोरोना काळात सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांमुळे अनेकांचा अभ्यास बुडाला. अशा ग्रामीण भागातील मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय असाच होता. 


पेठ तालुक्यातील गढईपाडा येथील विदयार्थ्यांचे तर अनोख्या पद्धतीने करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवात सहभागी होण्यासाठी पेठचे तहसीलदार संदिप भोसले गढईपाडा या छोटया पाडयावर उपस्थित झाले. गावकुसावरच त्यांनी गाडी थांबवत शाळेत पहिल्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या मुलांना आपल्या लाल दिव्याच्या गाडीत बसवून शाळेकडे मार्गक्रमण केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी लाल दिव्याच्या गाडीत शाळेत येतांना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी तहसीलदार संदिप भोसले यांचे हस्ते विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठयपुस्तके, शालेय गणवेश तसेच सोशल नेटवर्किग फोरम कडून स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तर लाल दिव्याच्या गाडीत शाळेत आल्याने येथील मुले आनंदून गेल्याचे पाहायला मिळाले.