मुंबई : माझ्याआधी माझ्या पुतण्याला अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी जाईल, असा प्रश्न विचारत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा खोडून काढला आहे. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना जामीन मिळावा, यासाठी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ आपल्या बंगल्यावर तासनतास बसलेले असायचे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. शिवाय छगन भुजबळांना जामीन मिळवून द्या, आम्ही कधीही राजकारणात दिसणार नाही, असंही समीर भुजबळ म्हणाल्याचा पाटील यांनी सांगितलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली. 


छगन भुजबळ म्हणाले की, "माझा पुतण्या समीर भुजबळ यांना माझ्याआधीच अटक करण्यात आली होती. मग माझा पुतण्या यांच्याकडे कधी जाईल? माझा मुलगा पंकजलाही समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग यांनी कोणता पुतण्या शोधून काढला? असं छगन भुजबळ म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.


"चंद्रकांत पाटील आणि पुतण्याची भेट झालीच नाही तर राजकारणात दिसणार हे सांगण्याचा प्रश्नच नाही. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो की समीर भुजबळ कधीही चंद्रकांत पाटील यांना भेटले नाहीत," असं भुजबळांनी नमूद केलं.


मैं अपना बंगाल नही दुंगी, अशी प्रतिज्ञा घेत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या : छगन भुजबळ


न्यायपालिकाही यांनी ताब्यात घेतली?
"माझ्यावरील केसेस कोर्टात आहेत. तरीही ते महागात पडेल आणि भारी पडेल असं बोलतात. याचा अर्थ काय समजायचा? सीबीआय, ईडी या यंत्रणाप्रमाणेंच न्यायपालिका ताब्यात घेतली की काय असं त्यांना सुचवायचं आहे का? असे प्रश्न भुजबळ यांनी विचारले. "आमच्या तारखा सुरुच आहे. आमच्यामागे एक नाही सात-आठ केस आहेत. सगळीकडे आम्ही जात असतो आणि पुरे पडत असतो, काळजी करु नका," असं त्यांनी सांगितलं.


पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून सांभाळून बोलावं 
"चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची तयारी ठेवायला हवी. यापुढेही वारंवार असे धक्के बसतील. त्यामुळे त्यांनी पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून सांभाळून बोललं पाहिजे," असा सल्ला भुजबळांनी दिली. तसंच पश्चिम बंगालमध्ये भाजपला नाकारले नाही तर नाकच कापलं आहे. मी फक्त म्हणालो होतो की ममता बंगालसाठी ममता झाशीच्या राणीसारख्या लढल्या. एकूणच काय तर हवा बदलत आहे," असं भुजबळ पुढे म्हणाले.


छगन भुजबळ म्हणाले की, "ध्यानीमनी नसताना, मला अटक होण्याच्या आधीच अटक होणार असं बोललं जात होतं. हे ठरवून करतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र सदनमध्ये 1 पैसे पेमेंट नाही, तिथे भ्रष्टाचार कुठून येणार? याचना करणं आमच्या रक्तात नाही.