Nashik Corona Update : देशभरात H3N2 या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढू लागताच निती आयोगाने आरोग्य यंत्रणेला दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. अशातच नाशिक शहरात सोमवारी एकाच दिवसात सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नाशिककरांनी धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता नाशिक शहरात कोरोनाबाधित (Corona Patient) रुग्णांची संख्या तेरावर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून H3N2 या विषाणूने दहशत पसरवली आहे. सर्दी, खोकला, ताप यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. अशातच कोरोनाने (Corona) सुद्धा पुन्हा डोके वर काढले असून नाशिक (Nashik) शहरात एकाच दिवशी सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीचे सात रुग्ण मिळून आल्याने शहरात ही संख्या तेरावर पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी अत्यवस्थ स्थितीत झाकीर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, सध्या त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक शहरात अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने (Corona Update) वैद्यकीय विभागाला धडकी भरली असून, त्यादृष्टीने पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. झाकीर रुग्णालय व बिटको रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्यात आला आहे, तसेच सध्या झाकीर रुग्णालयात 42 जंबो ऑक्सिजन सिलिंडर, तर तीन ड्युरा सिलिंडर तयार ठेवण्यात आले असल्याचे झाकीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावते यांनी सांगितले. झाकीर रुग्णालयात दाखल दोन रुग्णांपैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले, तर एका रुग्णाची प्रकृती स्थिर असून, या रुग्णाला किडनी, मधुमेह, रक्तदाब अशा व्याधीही असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13वर
नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दावा केला की, सध्या नाशिक महापालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन शिल्लक असून, रुग्णसंख्या वाढली अथवा ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्यास अवघ्या दोन तासांत पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकेल. तथापि, कोरोनाची अचानक संख्या वाढण्यामागे बदललेल्या हवामानाचे कारण दिले जात असले तरी, देशपातळीवर H3N2 या नवीन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना निती आयोगाने गर्दी टाळण्याच्या, तसेच चेहऱ्यावर मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, यासंदर्भातील कोणत्याही स्वतंत्र सूचना अद्याप महापालिकेला प्राप्त झालेल्या नाहीत. नाशिक शहरात शुक्रवारी सात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते व त्यांच्यावर विलगीकरणात घरातच उपचार केले जात होते. तथापि, सोमवारी पुन्हा नव्या सहा रुग्ण दाखल झाल्याने रुग्णांची संख्या 13वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे.
नाशिककर स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या...
नाशिक शहरात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2 या व्हायरसची साथ असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्दी खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले असून दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.