नाशिक : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्राकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून चारचाकी वाहनांमध्ये आता सहा एअरबॅग्स बसवा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना दिले आहेत. दरम्यान हा निर्णय नक्की का घेण्यात आला असावा? सहा एअरबॅग्स बसवणं उत्पादकांना कितपत शक्य आहे? यावरच एक नजर टाकूया. 


भारताची लोकसंख्या जसजशी दिवसाला वाढते आहे, तसतशी रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्याही पुढे जाते आहे. अनेक मेट्रो शहरांमध्ये तर या वाहनांचं प्रमाण एवढं वाढलंय की शहरवासियांना तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातांच्या घटनाही रोज कानी पडत असून सगळ्यांसाठीच हा चिंतेचा विषय बनलाय. याच पार्श्वभूमीवर भारतीय वाहन उत्पादक सोसायटीच्या कार्यकारी प्रमुखांच्या प्रतिनिधींची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेत त्यांना एक महत्वाची सूचना केली.


नितीन गडकरी यांनी 3 ऑगस्टला वाहन उत्पादकांची भेट घेत अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली विशेष म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चारचाकी वाहनांच्या सर्व श्रेणी आणि प्रकारांमध्ये आता किमान सहा एअरबॅग्स असाव्यात असे त्यांना निर्देश दिले.    


केंद्रातील वजनदार आणि व्हिजन असलेला नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडकरींनीच आता हे निर्देश दिल्याने वाहन उत्पादक आता चांगलेच कामाला लागले आहेत. सर्व चारचाकी वाहनांमध्ये या  एअरबॅग्स कशा उपलब्ध करून द्यायच्या? त्यासाठी वाहनांची रचना कशी करायची? या आणि इतर बाबींबाबत त्यांच्याकडून चाचपणी सुरु करण्यात आलीय.  


ऑटोमोबाईल एक्सपर्ट संदीप काळे यांनी म्हटलं की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा चांगलाच निर्णय आहे. टॉप एन्ड मॉडेलमध्ये जवळपास 6 एअरबॅग्स असतातच. मात्र आता बेसिकमध्येही द्याव्या लागतील. डॅशबोर्ड आणि इतर गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, मात्र यामुळे वाहनाची 10 ते 12 टक्क्यांनी किंमत वाढेल.


एअर बॅग्ससोबतच सध्याच्या इंधनाबाबतची सर्व परिस्थिती बघता ब्राझील आणि अमेरिकेतील यशस्वी तंत्रज्ञानाचा वापर करत 100 टक्के इथेनॉल आणि गॅसोलिनवर चालणाऱ्या गाड्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत कशा आणता येईल याबाबत अभ्यास करावा अशीही इच्छा गडकरींनी व्यक्त केली. या भेटीत वाहन उत्पादकांनी देखील वाहन उद्योगांसंदर्भात येणाऱ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या यात प्रामुख्याने बीएस सिक्स आणि सीएफएन टप्पा दुसरा या नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलावी अशी विनंती करत ओबीडी या दुचाकी वाहनांच्या नियमांबाबतही नाराजी व्यक्त केली. एकंदरीतच काय तर या भेटीमुळे वाहन उद्योजकांना काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे एअरबॅग्स संदर्भात नितीन गडकरींनी घेतलेली ही भूमिका नक्कीच स्वागतार्ह असून त्याची अंमलबजावणी आता नक्की कधीपासून होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.