नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस अद्यापही कायम आहे. यामुळे नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे, शिवाय जिल्हा देखील टँकरमुक्त झाला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 236 गाववाड्यांसाठी 84 टॅकरने पाणी पुरवठा केला जात होता. या माध्यमातून एक ते दीड लाख लोकसंख्येची तहान टँकरमार्फत भागवली जात होती. मात्र गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अवघ्या चार दिवसातच जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.
यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पाणी टंचाई सुरू झाली होती. अनेक भागात विहिरी कोरड्याठाक झाल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या भागात जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले होते. त्यातही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर सारख्या सर्वाधिक पाऊस होणाऱ्या तालुक्यांना देखील पाणी टंचाईने हैराण केले होते. त्याचबरोबर पेठ, सुरगाणा तालुक्यातही भीषण परिस्थिती होती.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले होते. यामध्ये येवला, सिन्नर, बागलाण, पेठ, सुरगाणा या ठिकाणी टॅकरच्या फेर्या सर्वाधिक होत्या. तब्बल 236 गावं व वाड्यांची 84टॅकरने तहान भागवली जात होती. तब्बल एक ते दीड लाख लोकांना टॅकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने टॅकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे होती. पण वरुण राजाने चार दिवसात केलेल्या जोरदार पावसामुळे पाणी संकट दूर झाले आहे.
चार दिवसात टँकर मुक्त
दरम्यान पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे जलसंकट दूर झाले असून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. चार दिवसातच जिल्हा टॅकरमुक्त झाला. जिल्हाप्रशासनाने एकूण परिस्थितीचा आढावा घेत टॅकर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: