Hemant Godse Interview : एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याची मागणी सर्व खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली, असं नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सांगितलं. मातोश्री बंगल्यावर काल (11 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्रातील 18 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार उपस्थित होते तर सहा खासदारांनी दांडी मारली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याच्या मागणीसह नैसर्गिक युती करा, या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं हेमंत गोडसे म्हणाले.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत मातोश्रीवर बैठक झाली. मातोश्रीवरील बैठकीबाबत माहिती देताना हेमंत गोडसे म्हणाले की, या बैठकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा या संदर्भात चर्चा झाली. सर्व खासदारांनी आपापली भूमिका मांडली. आता उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील.


विकासकामे करायची आहेत. दोन वर्षे उरली आहेत, त्यामुळे नैसर्गिक युती करा. एकनाथ शिंदे यांना स्वीकारा, अशी मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली, असं हेमंत गोडसे यांनी सांगितलं. तसंच एकनाथ शिंदे यांना पक्षात घेण्यासंदर्भात वारंवार विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले.


Shivsena : भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी


'25 वर्षांच्या युतीचा आणि अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीचा अनुभव वेगळा' 
दरम्यान, "25 वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीचा आणि अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी अनुभव वेगळा आहे. 25 वर्ष नैसर्गिक युती होती मात्र अडीच वर्षात अनेक प्रकल्प रखडले," असं हेमंत गोडसे म्हणाले. 


छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप 
"सिपेट प्रकल्पामुळे 2 हजार मुलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार होता. परंतु राष्ट्रवादीचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खोडा घातला. गोवर्धन शिवारात भुजबळ इन्स्टिट्यूट बाजूला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्याचे  सांगून गोवर्धन परिसरात होणाऱ्या प्रकल्पला विरोध केला," असा गंभीर आरोप हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.


मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक
मातोश्री (Matoshree) बंगल्यावर शिवसेना खासदारांची काल बैठक पार पडली. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 18 लोकसभा खासदारांपैकी सहा खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. या बैठकीला गैरहजर असलेले खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.