नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिकमधील गंगापूर धरण जवळपास ओव्हरफ्लो झालं आहे. सध्या गंगापूर धरणातून दिवसाला 5 हजार 100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.


नाशिक शहरातील दुतोंडया मारुतीच्या मानेपर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सलग 14 तास झालेल्या संततधार पावसाने नाशिकला पुन्हा एकदा मानवनिर्मित पुराची आठवण करुन दिली आहे. शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं तर अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबले.



एरव्ही पावसाच्या पाण्याने भरुन वाहणारी गोदावरी नदी शुक्रवारी सकाळी गटारगंगा झाली आहे. जुन्या नाशकातील गटारांचं पाणी रामकुंडाकडे पोहोचल्याने एरव्ही पवित्र मानल्या जाणाऱ्या रामकुंडात दुर्गंधीयुक्त मैला पाण्याचे ओढे वाहत आहे. गोदाकाठची अनेक मंदिरांमध्ये ड्रेनेजचं पाणी गेल्याने नागरिकांचा संताप झाला.

शहरातल्या सातपूर, अंबड, शरणपूर रस्ता, जुन्या नाशिकसह अनेक महत्वाच्या भागातील रस्त्यांना नद्यांचं रुप आलं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा फज्जा उडाला. सखल भागातल्या आणि शहरातल्या उपनद्यांच्या लगत असलेल्या वसाहतींमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं.

पावसाचं थैमान वाढल्यावर महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. परंतु ड्रेनेजची साफसफाई न करणाऱ्या, पाण्याचा निचरा न करु शकणाऱ्या विभागांमधील कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी प्रशासनाने त्यांना पाठीशी घालण्यातच धन्यता मानली. शहरातील नद्या, नाले, उपनद्यांवर झालेल्या अतिक्रमणांबद्दल या बैठकीत चकार शब्द काढला गेला नाही. नेहमीप्रमाणे पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही ठिकाणी अडचण झाली. कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असल्याचं सांगत महापालिकेने वेळ मारुन नेली.



खरंतर जून महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने नाशिककरांना जलप्रलयाचा अनुभव दिला होता. तासाभरात 90 मिमी पाऊस झाल्याने आणि एकाच दिवसांत ड्रेनेजमधून चक्क 46 टन प्लास्टिक कचरा गोळा झाल्याने महापालिकेने या आपत्तीसाठी निसर्ग आणि नाशिककरांना जबाबदार ठरवलं होतं. नाशिककरांनीही त्यावर विश्वास ठेवला. मात्र आता 12 तासात दीडशे मिमी झालेल्या संततधार पावसानंतरही नाशिकची झालेली त्रेधा पाहता महापालिकेने काहीच धडा घेतला नसल्याचंच उघड झालं आहे.

जुन्या नाशिकमधला सखल भाग कायम पूरग्रस्त राहतो हे मान्य केलं तरी नाशिकच्या या मानवनिर्मित पुराला इतरही अनेक कारण आहेत. संपूर्ण शहराच पावसाचं पाणी द्वारकावरुन जुन्या नाशिककडे वळवणारी पावसाळी गटार योजना, नद्या उपनद्या नाल्यांवर करण्यात आलेली अवैध बांधकामं, पार्किंग हे ही या आपत्तीला तितकीच जबाबदार आहे. पण महापालिकेची सत्ता असलेले भाजपचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यातून योग्य तो धडा घेऊन काम करतील तर खरं.