नाशिक : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्कचा शिक्का असणे बंधनकारक केला आहे. मात्र त्याचबरोबर 23-24 कॅरेटचे सोने विकू नये असे आदेश दिल्याने सराफा व्यवसायिक संभ्रमात आहेत. ग्राहकांकडून चोख सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली जाते. व्यवसायिकांचाही भर शुद्ध सोने देण्यावर असतो. मात्र सरकारने असा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी देशभरातील सराफा व्यवसायिकांच्या संघटनाचे प्रमुख ऑनलाईन संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यात तीन ते साडेतीन हजार सराफा व्यवसायिक आहेत. केवळ चार हॉलमार्क सेंटर आहेत, त्यामुळे हॉलमार्कचा शिक्का मारण्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.


एखादा दागिना किंवा सोने हे शुद्ध आहे का? किंवा किती कॅरेटचे आहे हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. प्रामुख्याने तीन टप्प्यात सोन्याची शुद्धता तपासली जाते. त्यानंतर त्याला हॉलमार्कचा शिक्का लावला जातो. पहिली सर्वसाधारण प्रक्रिया सोन्याचे दागिने हे थोडे घासले जातात. xrf मशीनमध्ये टाकून त्यातील सोन्याचे प्रमाण मोजले जाते.  22 कॅरेटचे सोने असेल तर कमीत कमी 916 ग्रॉम सोने शुद्ध असणे गरजेचे आहे. तर 18 कॅरेटसाठी 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के इतर धातू असणे आवश्यक असते. यापेक्षा कमी शुद्धता आढळून आली तर ते सोने बाद केले जाते.  म्हणजेच प्रमाणित नसल्याचा शेरा मारुन पुन्हा व्यवसायिकांकडे पाठवले जात असल्याची माहिती कारागीर रोहित माने यांनी दिली. 




 

तिन्ही टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोने शुद्ध असल्याचा खात्री पटल्यानंतर लेजरच्या माध्यमातून हॉलमार्कचा शिक्का लावला जातो. 14,18, 22, 23, 24 अशा प्रकारात सोन्याची विक्री केली जाते. महाराष्ट्रात पिवळे धमक म्हणजेच चोख सोन्याला जास्त मागणी हे तर दक्षिणेकडे कमी शुद्धतेचे लालसर सोन्याची विक्री होते. त्यामुळे सरकारने शुद्ध सोने विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सराफ व्यवसायिक किशोर वडनेरे यांनी केली आहे.


पहिल्या टप्प्यात सोने प्रमाणित आहे की नाही म्हणजेच 22 कॅरेट असेल तर त्यात 916 ग्रॅम शुद्ध सोने आहे की नाही याची खात्री होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्याची चाचणी होती. म्हणजेच सोन्यावर हिट ट्रीटमेंट केली जाते. त्यालाच फायर असाईन असेही म्हटले जाते. नायट्रिक अॅसिडमध्ये सोने टाकले जाते, त्यात केवळ आणि केवळ सोने शिल्लक राहते. चांदी किंवा इतर धातू हे वाफेच्या रुपाने उडून जातात. त्यांतर सोन्याचा तुकडा हा 1 हजार डिग्री सेल्सिअस तापमानावर तापवला जातो. ही प्रकिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते.


दुसरा टप्पा पार करुन शुद्धतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी तिसरा आणि शेवटच्या टप्प्यात सोने जाते, त्याला बॅलेन्स रुम असे म्हणतात. या रुममध्ये सुरुवातीला सोन्याचे वजन केले जाते आणि सर्व प्रकिया केल्यानंतर पुन्हा एकदा वजन केले जाते. यानुसार दागिना किती शुद्ध सोन्यात बनला आहे, यात चांदी किंवा इतर मिश्र धातूचे किती प्रमाण होते याची माहिती संकलित केली जाते. याच्या सर्व नोंदी ठवल्या जात असून त्याचे स्वतंत्र ऑडिट ही केले जात असल्याची माहिती हॉलमार्क सेंटरचे संचलाक दिलीप कदम यांनी दिली. सरकारच्या निर्णयानुसार सरफा व्यवसायिक काम करण्यास तयार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि 23-24 कॅरेट विक्री संदर्भात निर्माण झालेला संभ्रम सरकारने दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.