नाशिक : नाशिक शहराची तहान भागवणारे गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं धरण म्हणून ओळखलं जातं. हे धरण उडवून देण्याची धमकी प्राप्त होऊ गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तवही हे धरण चर्चेत होतं. मात्र याच गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलं असून एखादी मोठी दुर्घटना होण्याची प्रशासन वाट बघतंय का? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.


नाशिक तालुक्यातील गंगापूर धरण हे 1965 साली मातीपासून बांधण्यात आलं आहे. या धरणाची आठ टीएमसी एवढी पाणी साठवणुकीची क्षमता असून नाशिक शहराला यातून पाणीपुरवठा केला जातो. अनेक वेळा मराठवाड्याचीही तहान भागवण्याचं काम गंगापूर धरण करतं. विशेष म्हणजे 2018 साली हे धरण उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला होता. कधी असं झाल्यास अख्खं नाशिक शहर पाण्याखाली जाऊ शकते. मात्र एकीकडे ही परिस्थिती असतानाही या धरणाची सुरक्षा ही वाऱ्यावर आहे. अगदी धरणाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण धरण परिसरात एकही सुरक्षारक्षक, पाटबंधारे विभागाचे किंवा पोलीस कर्मचारी नजरेस पडत नाहीत. सुरक्षारक्षकांची केबिन फक्त नावाला असून त्यात स्थानिक गावकऱ्यांची वाहने उभी केली जातात. या परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे मात्र अनेकवेळा इथे सर्रासपणे पर्यटकांचा वावर सुरु असतो. एवढंच नाही तर दारुच्या पार्ट्या सुद्धा धरण परिसरात रंगत असतात. चिंतेची बाब म्हणजे या परिसरात एकूण पाच सीसीटीव्ही कॅमेरे नजरेस तर पडतात मात्र ते सर्व बंद अवस्थेत आहेत. अनेक कॅमेरे तर गायब झाले असून काही कॅमेरांमध्ये पक्ष्यांनी घरटेही करण्यास सुरुवात केली आहे.




पोलिसांकडून या परिसरात पेट्रोलिंग केले जाते मात्र तिथे कायमस्वरुपी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची गरज आहे. सुरक्षारक्षक तैनात करा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना फेब्रुवारी महिन्यात पोलीस प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला पत्राद्वारे करण्यात आल्या होत्या, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली असून सुरक्षेबाबत काळजी घेण गरजेचंच असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर मागच्या दोन वर्षात बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने धरणावर काम करण्यासाठी आमच्याकडे कर्मचारी कमी असल्याचं आश्चर्यकारक उत्तर नाशिक जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी दिल आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेरांचा प्रश्नही आम्ही लवकरच मार्गी लावू असं त्यांनी म्हटलं.  


एकंदरीतच काय तर पोलीस विभाग असो की पाटबंधारे विभाग दोघांनाही याबाबतचे गांभीर्य नसल्याचंच दिसून येत आहे. तसं बघितलं तर महाराष्ट्रात एखादी मोठी दुर्घटना किंवा अपघात झाल्यावरच प्रशासन म्हणा किंवा सरकारला जाग येत असते आणि अशीच एखादी दुर्घटना गंगापूर धरणावर होण्याची ते वाट बघत आहे का? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.