Vasu Baras : आदिवासी भागातील चालीरीती प्रथे प्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. मात्र नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात आजही या सणाला 'वाघबारस' म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे. सबंध भारतीय मुलखात व मुलखाबाहेरील भारतीय लोक दिवाळी हा सण वसुबारसेच्या दिवशी करत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्सवाने जपली आहे
यंदा मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. वसुबारस पासून दिवाळीच्या पहिल्या सणाला आपण सर्वजण धुमधडाक्यात सुरुवात करतो. पण भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा यांनी नटलेला देश म्हणून ओळखला जातो. त्याचमुळे काही किलोमीटर इथे प्रांत बदलतो तसे भाषा, परंपरा बदलत जातात. त्यात आदिवासी समाज तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसाठी प्रचलित आहे. त्यांच्या परंपरांचे आकर्षण देश विदेशातील पर्यटकांना देखील पडते. दिवाळीच्या सणानिमित्ताने वाघबारशीची आगळीवेगळी परंपरा पाहायला मिळते.
तसेच वाघबारशीच्या दिवशी घराच्या उंबरठ्याच्या बाजूला मातीचे बैल, गाय तयार केले जातात. याचबरोबर त्यांना गोठ्याचा आकाराचा मातीचे आळेही केले जाते. जेणेकरून मातीचे बैल त्यात ठेवता येतील. याचबरोबर या बैलांना आपल्या खऱ्या बैलांसारखा चारा खाऊ घालणे, पाणी पाजणे, आदी क्रिया केल्या जातात. सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते, या मातीच्या गोठ्याजवळ दिवाळीची पहिली पणती लावली जाते. त्याचबरोबर बैलाची पूजा अर्चा केली जाते. त्यांना गोड धोडाचा नैवद्य दिला जातो.
अशी आहे अनोखी परंपरा
सकाळी उठून अनेक लहान मूल हातात कापडी पिशव्या घेऊन टोळी तयार करतात. या टोळीत लहान मोठे मुलं मुली सर्वच जण सहभागी असतात. पहाटेला महिला वर्ग दिवाळीच्या पहिल्या दिवसामुळे पहाटेपासून सडा सारवण करत असते. अशातच ही टोळी घरा घरा जाऊन धान्य गोळा करते. यावेळी सर्व जण विशिष्ट आवाजात आवाज देऊन घरातल्या कुटुंबांनी टोळी आल्याचे सांगतात. 'येऊंद्या रे येऊंद्या वाघ्याची भोय, वाघे' 'येऊंद्या रे येऊंद्या वाघ्याची भोय, वाघे' अस दोन तीन वेळा आरोळी ठोकल्यानंतर घरातील महिला तांदुळ, गहू आदी धान्य आणून टोळीला देते. अस करत करत ही टोळी गाव पालथा घालते. यासारख्या इतरही टोळ्या झालेल्या असतात. मात्र ते स्वतंत्र गट तयार करून धान्य गोळा करतात. मग दुकानात जाऊन हे धान्य विक्री केले जाते. यातून स्वयंपाकाचे साहित्य विकत घेतले जाते. मग शेतात, रानात, नदीवर जाऊन ही मंडळी तिथे स्वयंपाक करतात. व जेवण करून घरी परततात. अशा प्रकारे वाघबारस साजरी करतात.
वेशीवर वाघोबा...
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांत वाड्या-वस्त्यांवर आजही वाघोबाची मंदिरे पाहायला मिळतात. दगडी किंवा लाकडाचा वाघोबा तयार करण्यात येऊन त्याला वाघासारखा रंग दिला जातो. या दुर्गम भागातील प्रत्येक गावात किंवा गावाच्या वेशीवर वाघोबा मंदिर असते. सह्याद्रीतील घाटरस्त्यांना आपल्याला वाघोबाच्या मूर्ती व औट्यांवर असलेली मंदिरे पाहवयास मिळतात.