Raise Marriage Age of Women from 18 to 21 : केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एकीकडे मुलीचे विवाहासाठीचे वय वाढवण्यात येत आहे तर दुसरीकडे अत्यंत कमी वयात मुलींचे विवाह करून दिले जात असल्याच्या घटना घडत आहेत. नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी तब्बल 42 बालविवाहाच्या (Child marriage) घटना रोखण्यात आल्या आहेत.   


नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी 42 बालविवाहाच्या घटना रोखण्यात महिला व बालविकास विभाग तसेच चाईल्ड लाईनला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 40 वधू होत्या तर फक्त 2 वर होते. जिल्ह्यात गेल्या वर्षी ऐन खेळण्या बागडण्याच्या वयातील 25 मुला मुलींचे विवाह पार पडले होते आणि चालू वर्षी गेल्या 11 महिन्यातच हा आकडा 42 वर जाऊन पोहोचला आहे. हे प्रमाण रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. 


चाईल्ड लाईनच्या सदस्यांच्या पाहणीत जी माहिती समोर आली त्यानूसार लॉकडाऊनच्या काळात आलेली आर्थिक मंदी, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना तसेच मुलींचे प्रेमसंबंध आणि त्याला पालकांचा असलेला विरोध, यामुळे मुलींचे विवाह लहान वयातच लावून दिले जात असल्याची काही मुख्य कारणं समोर आली आहेत.          
 
नाशिक जिल्ह्यात कुठे आणि किती बालविवाह रोखले?
नाशिक तालुका - 11 (1 वर,10 वधू )
सिन्नर तालुका - 7 (1 वर, 6 वधू )
मालेगाव तालुका - 6
निफाड - 4
दिंडोरी, चांदवड, सटाणा, त्र्यंबकेश्वर, देवळा, येवला - प्रत्येकी 2
नांदगाव, पेठ - प्रत्येकी 1


महत्वाच्या बातम्या