Agnipath Scheme Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. आज नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याआधीच संपले. पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ताब्यात घेतले. 


केंद्र शासनाने युवकांसाठी नव्याने अग्निपथ या योजनेची घोषणा केली. मात्र ही योजना सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आली आहे. या योजनेच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार आंदोलने सुरू आहेत. कुठे जाळपोळ तर कुठे दगडफेक केली जात आहे. बिहारमध्ये या आंदोलनात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आली आहे. 


राज्यातही आता या आंदोलनाचे लोन पसरले आहे. नाशिक युवक काँग्रेसच्या वतीने आज भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार होता. काँग्रेसच्या वतीने दोनशे आंदोलक भाजप कार्यायावर येणार अशी माहिती मिळाली होती. मात्र मोर्चाची कुणकुण लागताच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास आंदोलक रस्त्यावर उतरले. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन तिथेच हाणून पाडले.


केंद्र सरकारची अग्निपथ योजना ही युवा आणि देश विरोधी असल्याचा आरोप करत तसेच ईडीच्या सुरू असलेल्या कारवायांचा निषेध करत नाशिकमध्ये युवा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हातात निषेधाचे फलक घेत काँग्रेस कार्यालयापासून भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चाला महात्मा गांधी रोडवरील कॉंग्रेस कार्यालयापासून सुरुवात होताच काही अंतरावरच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकर्ते 20 आणि पोलिसांची संख्या 40 असे चित्र यावेळी बघायला मिळाले.


काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक


केंद्र सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ सैन्य भरती योजनेला विरोध म्हणून आंदोलन छेडण्यात आले होते. नाशिक युवक काँग्रेसच्यावतीने भाजप कार्यालय येथे नियोजित आंदोलनाला जात असताना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नेहरु गार्डन येथे रस्त्यातच पोलिसांनी ताब्यात घेतले.  


महत्वाच्या बातम्या


Agnipath Scheme Protest : बिहारमधील हिंसाचारामागे कोचिंग सेंटर', व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे भडकवले आंदोलन