Agnipath Scheme Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक राज्यांमध्ये यावरून हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घालत रेल्वे गाड्या पेटवून दिल्या. या हिंसाचारात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामध्ये आता कोचिंग सेंटर्सचे नाव पुढे येत आहे. हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचे फोन तपासल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही कोचिंग सेंटर्सनी हिंसक निदर्शने आणि चिथावणी देणारे संदेश व व्हिडीओ पाठवले. त्यामुळे आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याची माहिती पटनाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिली आहे.
बिहारमधील हिंसक निदर्शनांमागे अनेक कोचिंग सेंटरची भूमिका संशयास्पद असल्याचे चंद्रशेखर सिंह म्हणाले. "हिंसक निदर्शना प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत 7 ते 8 कोचिंग सेंटर्सनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या लोकांच्या फोनवर हिंसक संदेश पाठवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी 170 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी 46 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रशेखर सिंह यांनी दिली.
अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलखोरांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. यामध्ये कोणाचा हात आहे, अशा लोकांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दोन डझनहून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. शेकडो जणांना ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी राज्यात परिस्थिती आता सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. केंद्राने तरुणांसाठी चांगली योजना बनवली आहे. त्यातून त्यांना अनेक फायदे होतील, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. काल आंदोलनकर्त्यांनी प्रसाद यांच्या घरावर हल्ला केला होता.
महत्वाच्या बातम्या