नाशिक : सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल दिसून येतोय. मात्र, याच इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर काय होऊ शकते याचं एक उदाहरण नाशिकमध्ये समोर आलं आहे. शहरात एका दुचाकीचा स्फोट होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


पेट्रोलच्या तुलनेत अनेक इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत कमी आहे, तुलनेने देखभालीचा खर्चही जास्त नाही. या दुचाकी हलक्या असल्याने खास करून महिलांनाही त्या हाताळण्यास सोप्या जातात. इलेक्ट्रिक वाहने ही प्रदूषण विरहित असल्याने सरकारकडूनही त्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विशेष म्हणजे एकदा का दुचाकी चार्ज केली की 50 हून अधिक किलोमीटर अंतरही ती सहजरित्या कापते. मात्र, हिच दुचाकी चार्जिंग करताना तिचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली असून महाराष्ट्रात सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय.


इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसिडन्सीमध्ये राहणाऱ्या कुलविंदर कौर यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी त्यांनी ओकिनावा कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली होती. सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी चार्जिंगला लावली, त्यासाठी त्यांनी स्वतःच्या वीज मीटर मधून वीजेचे कनेक्शन घेतले होते.मात्र, साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक या गाडीचा स्फोट झाला आणि सोसायटीलाच मोठा हादरा बसला, स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकही ईथे गोळा झाले. या स्फोटात दुचाकीचा अक्षरशः कोळसा तर झालाच. मात्र, सोसायटीतील 6 वीज मीटरही यात जळून खाक झालेत आणि त्यामुळे सर्व सदस्यांच्या घरातील बत्तीही गूल झाली तसेच पार्किंग मधील दोन वाहनांसह अनेक भागाला याची झळ पोहोचली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने आमचे प्राण वाचले. यातच आम्ही समाधानी असल्याचं सोसायटीच्या सदस्यांनी बोलून दाखवलय.


दरम्यान हा सर्व प्रकार नक्की कशामुळे झाला असावा? इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी? याबाबत आम्ही इलेक्ट्रिक वाहनांचे तज्ञ राहुल मुंदडा यांच्याकडून जाणून घेतलं. हा सर्व प्रकार नक्की कशामुळे झाला असावा हे सांगणं अवघड आहे. मात्र, खरच त्यांनी बॅटरी किती वेळ चार्ज केली? बॅटरीची परिस्थिती काय होती? दुचाकीची ते नियमिपणे सर्व्हिसिंग करत होते का? चार्जर आणि बॅटरी ब्रँडेड होते की नॉन ब्रॅण्डेड? वीज पुरवठा सुरळीत होता का? अशा अनेक गोष्टींचा अभ्यास यात करावा लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलय. बॅटरी नेहमी चार्ज आणि डिस्चार्ज होणे गरजेचे असते. विशेष म्हणजे वाहनांचा वापर न करता बॅटरी अधिक चार्जिंग केली तरीही असे प्रकार होऊ शकतात. वाहनांची नियमितपणे सर्व्हिसिंग करावी, बॅटरीशी कोणतीही छेडछाड करू नये असा सल्लाही मुंदडा यांनी दिलाय.  


एकंदरीतच काय तर इलेक्ट्रिक दुचाकी दिसण्यास आकर्षक, वापरण्यास सोपी आणि खिशाला जरी परवडणारी अशी वाटत असली तरी मात्र ती हाताळतांना योग्य ति खबरदारी घेतली नाही तर कशाप्रकारे ते महागात पडू शकतं हेच यातून दिसून येतय.