नाशिक : सव्वा कोटी मुंबईकरांच्या पाण्यात विष कालवणाऱ्यांच दुकान अखेर बंद झालं आहे. वैतरणा धरणात मासेमारी करण्यावर जलसंपदा आणि पाटबंधारे विभागानं बंदी घातली आहे. झिंगे आणि मासे पकडण्यासाठी मत्स्यव्यावसायिक वैतरणा धरणातील पाण्यावर विषारी औषधांची फवारणी करत असल्यामुळे वैतरणा धरणाची सुरक्षितता धोक्यात असल्याचा ग्राऊंड रिपोर्ट ‘एबीपी माझा’नं दाखवला होता.


राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांची झाडाझडती 2 दिवसांत तात्काळ चौकशी कऱण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी जलसंपदा, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी धरण परिसरातील गावातल्या ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक घेतली.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित मच्छीमार संस्थेला मासेमारी बंद करण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर, धोकादायक पर्यावरणाला हानिकारक असलेली वनस्पती काढायचे आणि रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. त्यामुळं मुंबईकरांच्या पाण्याचं संरक्षण होऊन त्यांना शु्ध्द पाणी पुरवलं जाणार आहे.

जलसंपदा मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात औषधांची फवारी करणाऱ्यांची तात्काळ चौकशी करा असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वैतरणा धरणामध्ये मासेमारी करण्यासाठी पाण्यात विषारी औषधांची फवारणी केली जाते. यासंदर्भातलं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं त्यानंतर गिरीश महाजनांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

वैतरणा धरणात होत असलेल्या औषधांच्या फवारणीबाबतीत 2 दिवसात अहवाल देण्याची तंबीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दोषी असलेल्या अधिकारी किंवा मत्स्य व्यवसीयकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजनांच्या झाडाझडती नंतर डॅमवरच्या बंद कार्यालयाच टाळ अखेर उघडलं. अधिकारी,कर्मचारी कार्यालयांमध्ये हजर झाले आहेत.

काय आहे प्रकरण ?

मुंबईकरांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ कऱण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा धरणांत खेळला जातोय. झिंगे, मासे पकडण्यासाठी अवैध मत्स्य व्यावसायिक करणाऱ्या काही लोकांकडून वैतरणाच्या पाण्यात विषारी औषध फवारलं जात आहे. धरणकाठी गावात आजारांची साथ आली. त्यामुळे इथलं वैशिष्ट असलेला कोंबडा मासाही नामशेष झाला आहे.

शेतातली खतं निरुपयोगी ठरु लागल्यावर हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. मात्र पाटबंधारे, जलसंपदा, पोलीस आदी शासकीय विभागांनी पूर्णपणे डोळेझाक केल्यामुळे हा प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

वैतरणा धरणाच्या पाण्याजवळ गेले की या विषारी औषधाची दुर्गंधी सहजपणे अनुभवायला मिळते. मांसाहारी लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या झिंग्याला मोठी मागणी आहे. निर्यातीत 200 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्यानं मत्स्य व्यवसायातील नाशिकमधल्या काही माफीयांनी आपला मोर्चा वैतरणाकडे वळवला.

स्थानिक आदिवासी मच्छिमार संस्थांच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी हा उद्योग सुरु ठेवला आहे. गावकऱ्यांच्या विरोधामुळं सध्या मध्यरात्री गाड्या घेऊन यायच्या आणि विषारी औषधाने मेलेले मासे, झिंगे जमा करुन घेऊन जाण्याचा उद्योग सुरु आहे. हे प्राणी किनाऱ्यावर येऊन अडकावे म्हणुन काही धोकादायक वनस्पतीही मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आल्या आहेत. ज्यात अडकून अनेक युवक आणि प्राण्यांचा मृत्यु झाल्याचंही गावकरी सांगतात.