नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु असल्यामुळं स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्ह्यातल्या अनेक नद्यांची पातळीही चांगलीच वाढली आहे. नाशिक शहरांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरीत पावासाचा जोर वाढला आहे. येत्या काही तासाच लगतच्या जिल्ह्यातही पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.


नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये धुवाधार पाऊस सुरु असून, काल सकाळी 8 वाजल्यापासून ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत  24 तासात इगतपुरीत 220 मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये 148 मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. गेल्या 24 तासात बरसलेल्या पावसाने बळीराजाही चांगलाच सुखावला आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, चांदवड, देवला, येवला, नंदनगाव, मालेगाव आदी परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 45.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पश्चिम पट्ट्यासह पूर्व भागातही पावसानं दमदार हजेरी लावल्याने, भाताच्या रोपांना नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात बरसलेल्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे.

पावसाची ही स्थिती अशीच कायम राहिल्यास खरीप हंगामातील भात लागवडीस वेग येण्यास मदत मिळेल. दरम्यान, काल आणि आज बरसलेल्या पावसामुळे नाशिक परिसरातील वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.