शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाषण करणं सोपं आहे, पण अशी भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.


अजित पवार म्हणाले की, "काही लोक जातीय तेढ निर्माण करणारे भाषण करतात. भोंगे लावायला सांगतात. भाषण करणं सोपं आहे, पण अशी भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? त्यांचे नगरसेवक देखील सहमत नाहीत. कोणाला तरी बरं वाटावं, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण करतात, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला.


प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात : गृहमंत्री
राज्यात वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने आंदोलनं केली जात आहेत. संघर्ष निर्माण केले जात आहेत. राजकारण म्हणून आंदोलन केली जातात. त्रिपुरामधील घटनेचे पडसाद मालेगांव, अमरावतीमध्ये उमटतात, आंदोलन केली जातात. पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी अशांतता निर्माण केली जाते. समाजात तेढ निर्माण केला जाते. सर्वत्र असं सुरु आहे. आता अजान आणि हनुमान चालीसावरुन वाद सुरु आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात," असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याच कार्यक्रमात म्हटलं.


राज ठाकरे काय म्हणाले होते?
शिवाजी पार्कवरील 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, "मशिदींवर एवढ्या मोठ्या आवाजात भोंगे का लावतात? मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार."


राज ठाकरेंच्या टिप्पणीवर पक्षाचे मुस्लीम नेते नाराज
दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणात मशिद आणि मदरशांबाबत केलेल्या टिप्पणीवर मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर मागील दोन दिवसात मनसे पक्ष सोडणाऱ्यांची संख्या दोन झाली आहे. पंजाबी म्हणाले की, "मुस्लीम समुदायातील अनेक लोक माझ्या परिसरात राहतात. माझे त्यांच्यासोबतचे संबंध चांगले आहेत. भोंगे आणि मदरशांबाबत राज ठाकरे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. तर पुण्यात मनसेचे शाखाप्रमुख मजीद शेख यांनी सोमवार (4 एप्रिल) राजीनामा दिला होता.


संबंधित बातम्या