नाशिक : शहरात गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आज (11 डिसेंबर)तब्बल 75 लाख 30 हजार रुपयांची धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे साडेपाच वाजता गंगापूर रोड या उच्चभ्रू परिसरातील एलिमेंट्स या आयफोन शो रूम मधून चोरट्यांनी 82 मोबाईल, 17 डिजिटल वॉच, 13 ईयर फोन आणि 1 लाख 83 हजार रोख रक्कम असा एकूण 75 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार प्राथमिकदृष्ट्या 5 चोरांनी शो रुमचे मुख्य शटर वाकवत आत प्रवेश केला असून अर्धा तासात त्यांनी हात साफ करत पळ काढला आहे. व्यवस्थापकाने गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार संध्याकाळी अज्ञातांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक चोरांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या कॉम्प्लेक्स मधील प्रत्येक दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासोबतच प्रत्येक दुकानाबाहेर सुरक्षारक्षक तैनात आहेत. मात्र, असे असताना देखील चोरांनी हे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय.

गंगापूर रोड या उच्चभ्रू परिसरात ही चोरी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहदारीच्या ठिकाणी इतकी धाडसी चोरी होत असेल तर शहराच्या इतर भागाच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारु लागले आहेत. यापूर्वीही शहरात भरदिवसा सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलीसांचा धाक नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

गुन्हे रोखण्यासाठी 'सीसीटीव्ही'ची नजर
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. दिवसाआड कुठे ना कुठे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच नाशिक सराफ असोसिएशनच्या माध्यमातून कारंजा भागातील सराफ बाजारात ठिकठिकाणी 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शहरात शासनाकडून 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या :

अमरावतीत धुमाकूळ घालणाऱ्या 'बंटी-बबली'ला बेड्या, चक्रावून टाकणारी चोरीची पद्धत

तुळजाभवानीचे दागिने पुन्हा गायब; मंदिर समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं कृत्य

Aurangabad Theft | गाडीच्या काचा फोडत लाखोंची चोरी, बॅंकेतून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांवर चोरांची नजर | ABP Majha