मुंबई : संपूर्ण देश हैदराबाद महिला पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे हादरून गेला असतानाच महाराष्ट्रातही बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. अजून देशभरात हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या विदारक आठवणी ताज्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नागपुरात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचे प्रयत्न करण्यात आला असून दगडाने ठेचलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला, तर नाशिक, बीड, जालन्यातही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.


नागपुरात चिमुकलीवर बलात्कार, दगडाने ठेचून हत्या

नागपुरात आणखी एका चिमुकलीवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये अवघ्या 5 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर संशयास्पद पद्धतीने तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर काही नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोर निदर्शने केली. दरम्यान शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी करत आंदोलन केलं आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. चिरमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा संशय आहे.

नाशिकमध्ये सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

एका सात वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. अंबड परिसरात शेजारीच राहणाऱ्या एका भाडेकरूने खेळण्याच्या बहाण्याने या मुलीला घराबाहेर बोलावून तिला आपल्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केले, काही वेळाने घरी आलेल्या मुलीने घडलेली हकीकत आपल्या आईला सांगताच हा सर्व प्रकार समोर आला. नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांना या ठिकाणी पाचारण करत स्थानिकांच्या मदतीने 26 वर्षीय आरोपी कैलास कोकणीला पोलिसांच्या ताब्यात दिले. कैलास हा नाशिकमध्येच एका कंपनीत वेल्डरच काम करतो. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, कैलासवर अंबड पोलीस ठाण्यात रात्री पॉक्सो कायद्यासह बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे अंबड परिसरात खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ : काय आहे पॉक्सो कायदा?



जालन्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार

जालन्यातून अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना शहरातील एका अल्पवयीन मुलीला विक्री करण्याच्या उद्देशाने तब्बल 23 दिवस हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे डांबून ठेवल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. या काळात मुलीवर आरोपींनी अत्याचार केल्याची घटनाही उघडकीस असून या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. दरम्यान, तेरा वर्षांच्या मुलीला फुस लावून जालन्यातून अपहरण करण्यात आलं होतं. 23 दिवसांनंतर मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली.

बीड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बीड तालुक्यातील मैंदा गावा मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आई वडील ऊसतोड मजूर असून ते गेल्या महीना भरात ऊसतोडणीसाठी गेले होते. अशातच ती आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होती. रस्त्यावरून एकटी जात असताना त्याच गावात राहत असलेल्या अठरा वर्षीय तरूणाने बळजबरीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान पीडित मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आई-वडील कारखान्याहून परतल्यानंतर मुलीला घेऊन पिपंळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर मोमीन फरार आहे.

संबंधित बातम्या : 

नागपूरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या, अत्याचार झाल्याचा संशय

काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं?

Hyderabad Rape Case : पोलिसांकडून चारही आरोपींचा एन्काऊंटर