नाशिक : पुण्यानंतर नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या जवळपास 1495 नाशिककरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. हेल्मेट सक्तीनंतर आता नाशिकरांची हेल्मेट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
नाशिकमध्ये सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. त्यानंतर हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकांकडून 500 रुपयांचा दंड आकरण्यात येतो आहे. या दंडाचा धसका घेत नाशिककरांनी हेल्मेट खरेदी करणे पसंत केलं आहे. त्यामुळे हेल्मेट खरेदीसाठी वाहनचालकांनी दुकानामध्ये गर्दी केली आहे. शहरातील जवळपास सर्वच दुकानांबाहेर हेल्मेट खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
या कारवाईसाठी जवळपास 500 पोलीस नाशिकमधील रस्त्यावर उतरले होते आणि शहरातील 25 ठिकाणी तपासणी सुरु होती. हेल्मेट न घालणाऱ्या 1495 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून 7 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यावेळी नियमीत हेल्मेट घालणाऱ्या नागरिकांचा फुले देऊन सत्कारही करण्यात आला. स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घाला, असं आवाहन नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.
नाशिककर हेल्मेट सक्तीविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत
पुणेकरांप्रमाणे नाशिककरांनीही हेल्मेटसक्तीला विरोध केला आहे. या हेल्मेट सक्तीविरोधात नाशिककर न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी लवकरच जनआंदोलन छेडणार असून हेल्मेटसक्ती शहराबाहेर महामार्गावर करा, शहरात नको, अशी मागणी नाशिककरांना केली आहे.
या कारवाईदरम्यान अनेक वाहनचालकांनी पोलिसांशी वादही घातला. दंड भरत असूनही पोलीस अरेरावी करत असल्याचा वाहनचालकांनी आरोप केला. तसेच 500 रुपये दंड घेण्यापेक्षा पावतीच्या बदल्यात 500 रुपयांचं हेल्मेट तरी द्या, अशी मागणीही वाहनचालकांनी केली.
पुण्यात हेल्मेटसक्तीमुळे अपघाती मृत्यूचं प्रमाण घटलं
पुण्यात हेल्मेटसक्तीनंतर अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. हेल्मेट सक्ती लागू केल्याच्या 4 महिन्यानंतर गेल्या वर्षीपेक्षा 23 जणांचे अपघाती मृत्यू कमी करण्यात पुणे वाहतूक पोलिसांना यश आलं आहे. पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेल्या विरोध झुगारून पोलिसांनी हेल्मेटसक्ती लागू केली. पुणे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारल्यापासून अपघाती मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचे आदेश वाहतूक शाखेला दिले होते.