मनमाड : पिण्यासाठी साठवून ठेवलेल्या 300 लिटर पाण्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नाशिकमधील मनमाडमध्ये समोर आली आहे. मनमाडमधील श्रावस्तीनगर भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी याबाबत पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
विलास अहिरे यांनी छतावर असलेल्या टाकीत पाणी साठवून ठेवले होते. काही दिवसांसाठी आहिरे बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी टाकीतील 300 लिटर पाणी चोरुन नेले. ही चोरीची घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
एकीकडे अगोदरच शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. तर दुसरीकडे पाणी चोरीच्या या घटनेमुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून पाण्याची राखण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
मनमाड शहरात सध्या 20 ते 22 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महिन्याभराचे पाणी मनमाडकर टाकीत साठवून ठेवत असतात. मात्र छतावरील पाण्याच्या टाकीतून पाणी चोरीला गेल्याने चिंतीत झालेल्या विलास अहिरे यांनी चोरीची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
चोरट्यांनी टाकीतील 300 लिटर पाणी चोरी केल्याने माझ्या कुटुंबाला पाणी टंचाईचा सामना करवा लागत आहे. तरी याबाबत चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विलास अहिरे यांनी पोलिसांकडे केली आहे.
राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
राज्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. धरणांतील पाणीसाठाही कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईचं मोठं संकट राज्यातील अनेक भागात निर्माण झालं आहे. राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.
आणखी वाचा