Nashik Weather Update नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik News) निचांकी तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरात 9.8 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सोमवारी 29.3 कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली.
मकर संक्रांतीपासून (Makar Sankranti 2024) दिवस वाढतो आणि तीळ तीळ थंडी कमी होते, असे म्हटले जाते. मात्र, यंदा उलट चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकमधील किमान तापमानात अचानक घट झाली आहे. मंगळवारी पारा 9.8 अंशांवर जाऊन पोहोचला आहे. थंडीमुळे (Cold) नाशिककर चांगलेच गारठले आहेत.
दोन ते तीन दिवस थंडी कायम
दोन दिवसांपूर्वी रविवारी किमान तापमान 15.4 होते ते मंगळवारी 9.8 अंश सेल्सिअस वर जाणून पोहोचले आहे. उत्तरेकडील शीत लहरींचा परिणाम सध्या दिसून येत आहे. आणखी दोन ते तीन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
निफाड @7.4
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात मंगळवारी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी निफाडला निचांकी तापमान नोंदवले गेले. दरम्यान, निफाड तालुक्यात 25 डिसेंबरला 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही अंशी उकाडा पुन्हा वाढला होता. आता सोमवारी (दि. 15) म्हणजेच 21 दिवसांनी वर्षभरातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाडला करण्यात आली.
अनेकांनी पेटवल्या शेकोट्या
थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. थंडीमुळे रस्त्यांवर सकाळी वर्दळ कमी दिसून आली. तसेच नागरिकांनी उबदार कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळाले. कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी फायद्याची ठरणार आहे. मात्र वाढत्या थंडीने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
काही ठिकाणी पावसाची शक्यता
मंगळवारपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मंगळवारी (दि. 14) आणि बुधवारी (दि. 15) जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगळ्या ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी 2024 पासून केरळ-माहे, दक्षिण आतील कर्नाटक, तामिळनाडू-पुडुचेरी-कराईकल, रायलसीमा आणि किनारी आंध्र प्रदेश आणि यानामच्या लगतच्या भागात ईशान्य मोसमी पाऊस थांबला आहे. मंगळवारी देशाच्या दक्षिणेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या