Nashik News : बाजार समिती फी एक रुपयावरून 75 पैसे करावी, या मागणीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Manmad Bajar Samiti) व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असल्याने मनमाड बाजार समिती बंद राहणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी बाजार फी 75 पैसे देण्याबाबत पत्र दिल्यानंतर तत्काळ बाजार फी 90 पैसे करण्यात आली. पुढील काळात निर्णय घेण्याचे आश्वासन देवूनही व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याचे बाजार प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या लाल कांदा व मक्याची मोठी आवक आहे. बदलत्या ढगाळ वातावरणामुळे शेतमाल खराब होत चालला आहे. शेतकऱ्यांची कांदा आणि मका काढून विक्रीसाठी लगबग असतानाच अचानक व्यापाऱ्यांनी बंदची भूमिका घेतली असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीचे दिवस आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेला शेतमाल विक्रीसाठी तयार ठेवला आहे. मात्र बाजार समिती बंद असल्यामुळे माल विक्री करायचा कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मनमाड व्यापारी असोसिएशन व कांदा व्यापारी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी बाजार समितीची फी कमी करण्यात यावी, ती कमी करून 75 पैसे इतकी करण्यात यावी. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास बाजार समितीने मार्केट फी कमी करावी, अशी विनंती केली होती. मात्र बाजार समितीने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. यामुळे आजपासून बेमुदत बंद पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत आमचा निर्णय मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही लिलावात सहभागी होणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे आजपासून मनमाड बाजार समिती बंद राहणार आहे. या बंदमुळे शेतकरी व बाजार समितीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.


शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही


दरम्यान, याबाबत मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांनी म्हटले आहे की, व्यापारी असोसिएशनच्या पत्रावर आम्ही बोर्ड मीटिंग घेऊन याबाबत चर्चा केली. व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आम्ही सुरवातीला 10 पैसे फी कमी केली, 1 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. भविष्यात सर्व आर्थिक विचार करून हळूहळू बाजार फी २५ पैसे कमी करून ७५ पैसे करू, असे आश्वासन दिले. मात्र, व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बाजार समिती बंद राहील. यावर देखील आम्ही लवकरच तोडगा काढून निर्णय घेऊ. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.


आणखी वाचा 


मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; मुख्यमंत्र्यांची मागणी कृषीमंत्र्यांकडून मान्य; सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ