Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नाशिकमध्ये (Nashik) तीन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नांदगाव मनमाड महामार्ग (Nandgaon - Manmad Highway), नाशिकच्या सातपूर परिसरात (Satpur) आणि देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात अपघात झाले आहेत. 


मोटारसायकल-कंटेनरचा अपघात, तरुणाचा मृत्यू


पहिली घटना नांदगाव - मनमाड रोडवरील बुरकुलवाडी परिसरातील हनुमान मंदिरासमोर घडली. मोटारसायकल व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात नागापुर येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिका बोलावून तरुणाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. 


अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नांदगाव - मनमाड महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. जळगाव, संभाजीनगर जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक यासह इंधन कंपनीच्या टँकरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. यामुळे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 


सिटीलिंकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू


दुसरी घटना सातपूर परिसरात घडली आहे. आज सकाळी भाऊसाहेब भादेकर (74) हे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना सिटीलिंक बसने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाऊसाहेब भादेकर हे सातपूर कॉलनीतील रहिवासी होते. 


दोन दुचाकींचा भीषण अपघात, एक ठार, एक जखमी


तिसरी घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे. देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर (26) हा आपल्या दुचाकीवरून नाशिकरोडकडे येत होता. त्याचवेळी ओमकार बंडू गायकवाड (24) हा आपल्या दुचाकीने नाशिकरोडकडून भगूर येथील घरी जात असताना हॉटेल निक्की सागर समोर त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बार्ल्स स्कुल येथील शिक्षक शॉन मार्क बेलसेर हे जागीच ठार झाले तर ओमकार गायकवाड हा गंभीर जखमी झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या