Hiraman Khoskar नाशिक : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठा भूकंप घडला. त्यानंतर त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. 


तसेच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचा फोन नॉट रीचेबल असल्याने ते देखील काँग्रेसला रामराम ठोकणार का? असा चर्चांना उधाण आले होते. आता आमदार हिरामण खोसकर यांच्या कार्यालयातून पत्राद्वारे याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.   


नेमकं काय म्हटलंय पत्रात?


राज्य शासनाच्या वतीने 5 फेब्रुवारीपासून काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर अभ्यास दौऱ्यासाठी केनिया देशात गेले आहेत. त्यामुळे त्यांचा फोन नॉट रीचेबल आहे. आमदार खोसकर यांच्या पक्षांतराबाबत विविध बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. मात्र यात काहीच तथ्य नाही असा खुलासा हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाद्वारे करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारीला अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर हिरामण खोसकर भारतात परततील. यानंतर भूमिका करणार, अशी माहिती खोसकर यांनी दिली आहे. 


कोण आहेत हिरामण खोसकर?


नाशिक जिल्ह्यात एकूण 15 आमदार आहेत. यात काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. हिरामण खोसकर काँग्रेसचे असले तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांशी (Chhagan Bhujbal) त्यांचा चांगला संबंध आले. हिरामण खोसकर हे आदिवासी बहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. 


अशोक चव्हाणांचा आज भाजपमध्ये प्रवेश


अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी भाजप कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुपारी 12.30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश होईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार अमर राजूरकर (Amar Rajurkar) हेदेखील  भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. 


अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी?


अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारीला होणार होता. मात्र अचानक त्यांचा आजच पक्ष प्रवेश होणार आहे. राज्यसभेसाठी नामंकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आले असल्याने अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.


आणखी वाचा 


Rajya Sabha Election 2024: भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार; अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अडचण, समीकरण काय?