Nashik News : चक्क कारच्या किंमतीत एका शेतकऱ्याने (Farmers) बैलजोडी खरेदी केल्याची घटना नाशिकच्या (Nashik) नामपूर बाजारात घडली आहे. शेतकऱ्याने चक्क साडेपाच लाख रुपयांना खिलार जातीची बैलजोडी खरेदी केली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण शेतकऱ्याने एवढ्या मोठ्या किंमतीला बैलाची जोडी खरेदी केलीय. राजूबाबा सूर्यवंशी असं नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथील शेतकऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे या बैलजोडीची गावातून बँडच्या सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फेटा बांधलेले ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
बैलजोडीची गावातून बँडच्या लावून सवाद्य मिरवणूक
शेतीसाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे बैल. खिलार जातीच्या बैलांना बाजारात मोठी मागणी असते. अनेक शेतकरी हौस म्हणून शेतीसह शर्यतीसाठी देखील खिलारी बैलांची खरेदी करतात. नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथील एका शेतकऱ्याने चक्क नामपूर बाजार समितीमधून पाच लाख 51 हजार रुपयांना खिलारी बैलांची जोड खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या बैलजोडीची गावातून बँडच्या लावून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फेटा बांधलेले ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. घरोघरी या बैलजोडीचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. दरवर्षी एकादशीला काढण्यात येणाऱ्या मुंजवाड ते बेज पायी दिंडीतील रथासाठी ही बैलजोडी खरेदी करण्यात आली. देवाच्या कामाला ही बैलजोडी असल्यानं त्यांची किंमत करायची नाही म्हणून सांगितल्या किंमतीला ही बैल खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकमध्ये विक्रीसाठी आली होती बैलजोडी
बैलाची जोडी खरेदी करणाऱ्या राजूबाबा सूर्यवंशी यांनी सांगितले की, पायी दिंडीतील रथासाठी बैलांची जोडी खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळं या बैलांची किंमत करायची नाही. सांगेल त्या किंमतीला बैलांची खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. राजूबाबा सूर्यवंशी यांनी नामपूर बाजार समितीमधून खरेदी केलेली बैलांची जोडी ही अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकमध्ये विक्रीसाठी आली होती. राजूबाबा सूर्यवंशी यांना आमची बैलाची जोडी आवडली होती. त्यामुळं त्यांनी आमची बैलाची जोडी खरेदी केल्याची माहिती बैलाच्या मालकांनी दिली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात खिलारी बैलांचे मोठे बाजार भरतात. खिलारी जातीच्या बैलांना बाजारात मोठी मागणी असते. मात्र, सध्या पशुधनाची संख्या कमी होताना दिसत आहे. दिवसेंदिवस चाऱ्यासाठी वाढत जाणारा खर्च, हवामानातील बदलामुळं शेती पिकांना बसणारा फटका यामुळं बैलांची संख्या कमी होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nandurbar: नंदुरबारातील अक्कलकुवा कालिका मातेच्या यात्रेत बैल बाजार फुलला, खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल