Nashik News : मकर संक्रातीच्या (Makar Sankranti 2023) पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे ऐन मकर संक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे चिमुरडीच्या कुटुंबियांवर संक्रांत आली आहे.
पतंगबाजी करताना सर्रास नायलॉन मांजाचा वापर
एकीकडे मकर संक्रातीच्या काही दिवस आधीच नायलॉन मांजा (Nylon Manja) न वापरण्याची शपथ घेतली गेली. मात्र दुसरीकडे पतंगबाजी करताना सर्रास नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. आज मकर संक्रातीच्या निमित्ताने शहरभर पतंग आभाळात दिसून येत आहेत. तर दुसरीकडे मांजामुळे अनेक भागात नागरिक जखमी होत आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नायलॉन मांजाचा फास काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
नायलॉन मांजामुळे दहा वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी
दिंडोरी तालुक्यातील धामणगाव परिसरात ही घटना घडली आहे. आरिफा शेख असं या 10 वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. शाळा सुटल्यानंतर आरीफा ही घरी जायला निघाली. तिला घेण्यासाठी मामा दुचाकी घेऊन आला. त्यानंतर दोघेही शाळेतून घरी जाण्यासाठी दुचाकीवर निघाले. यावेळी धामणगाव नदीच्या पुलावर आले असता पाठीमागे बसलेल्या आरीफाचा नायलॉन मांज्यामुळे गळा कापला गेला. सायंकाळी सहा वाजेचा दरम्यान ही घटना घडला. दरम्यान जखमी आरीफाला उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ठोस उपाययोजना करण्याची गरज
मकर संक्रांतीदरम्यान आठ ते दहा दिवसांमध्ये मोठया प्रमाणावर पतंगबाजी होत असते. मात्र अशावेळी पशु-पक्ष्यांसह नागरिक जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर उपाय म्हणून नाशिक (Nashik Police) पोलिसांनी देखील यावर बंदी घालण्यासाठी नायलॉन मांजा हस्तगत केला जात आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांविरोधात थेट कारवाईदेखील सुरू केली आहे. मात्र तरीदेखील नायलॉन मांजाचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या सर्व घटनांवरून लक्षात घेणे गरजेचे आहे.
पोलिसांकडून नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन
नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मकरसंक्रात सण उत्साहात साजरा होत असून या सणानिमित्त नाशिक शहरात पतंग उडवण्याचा उत्सव सर्वजण साजरा करतात. परंतु पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉनच्या मांजा वापरला जातो. नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली आहे. परंतु आपणही पतंग उडवताना बंदी असलेल्या नायलॉन मांजा याचा वापर करत असाल तर आपणास आवाहन करण्यात येते की, सदर नायलॉन मांजामुळे मागील काही काळात त्यामध्ये अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झालेले आहेत तसेच अनेक पशुपक्षी नायलॉन मांजा अडकून जखमी झालेले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.