बीड : पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना घेणे, हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर जयंत पाटील शनिवारी बीड (Beed) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील इच्छूक उमेदवारांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
जयंत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने 35 कोटींची तरतूद केल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली. यावरून जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले ट्विट हे त्यांनी केले नाही, त्यांना करायला लावले आहे. डॉन सिनेमात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती, हे फक्त अभिनेत्रीलाच माहिती होते, तशी गत लाडकी बहीण योजनेची आहे, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणे आत्मघातकी प्लॅन
तर धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे, असे राजकारण कधीच केले नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जयंत पाटलांच्या पत्रकार परिषदेत बत्ती गुल
बीड येथे शासकीय विश्राम गृहात जयंत पाटील यांची सुरू होती. मात्र, यावेळीच लाईट गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर लाईट आल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद सुरळीत झाली. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बीडमधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी सरकारनं केली 35 कोटींची तरतूद, अजित पवारांनी दिली माहिती