Sula Fest 2025 : जगभरातील वाईन प्रेमींना प्रतिक्षा असणाऱ्या सुला फेस्टला (Sule Fest 2025) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सोबतीला वाईनचा ग्लास, असा इलेक्ट्रिफाईन वातावरणात सुलाफेस्टचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुला विनयार्डमध्ये पुन्हा एकदा सुला फेस्टचा जोशपूर्ण अनुभव वाईन प्रेमींना घेता आला. कोरोनापासून सुला फेस्ट बंद होता. त्याला शनिवारपासून (दि, 01) धुमधडाक्यात सुरुवात झाली. दोन दिवसीय सुलाफेस्ट वाईन प्रेमींना आपल्या रंगात रंगवून टाकणारा ठरतोय. पहिल्याच दिवशी वाईनचे एक-एक ग्लास रिचवणारी तरुणाई संगीताच्या तालावर थिरकत होती. विद्युत रोषणाईच्या झगमगाटाने उजळून गेलेला वाईनरीचा परिसर, त्यात नॅशनल इंटरनॅशनल बँड आणि कलाकाराचे सादरीकरण आणि सोबतीला वाईनचा ग्लास या वातावरणात तरुणाई स्वतःला हरवून बसली होती. कोणी गुजरात मधून आले होते, कोणी पश्चिम बंगालमधून तर कोणी थेट परदेशातून वाईनच्या रंगात रंगण्यासाठी आले होते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने या फेस्टिव्हलचा आनंद घेताना पाहायला मिळाले.
डिवाईन ठरला मुख्य आकर्षण
सुलाफेस्टच्या पहिल्या दिवशी जवळपास पाच हजाराहून अधिक रसिकांनी भेट दिली. या संगीत महोत्सवात विविध प्रकारच्या संगीताचे अद्भुत मिश्रण पाहायला मिळाले. कालीकर्मा (डाऊन टेम्पो इलेक्ट्रॉनिका), पिंक मॉस (आर & बी/निओ सोल), परवाज (प्रोग्रेसिव्ह रॉक), व्हेन चाय मेट टोस्ट (इंडी फोक), ड्युअलिस्ट इन्क्वायरी (लाइव्ह इलेक्ट्रॉनिका) आणि डिवाइन (हिप-हॉप/रॅप) यासारख्या प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणांनी वातावरण अक्षरशः भारावून टाकले आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवले. दोन दिवसात तब्बल 12 बँड आपले सादरीकरण करणार आहे. त्यात पहिल्या दिवसाचे खास आकर्षण डिवाईन बँड होता. तर दुसऱ्या दिवसाचे आकर्षण धारावीमधील बँड राहणार आहे.
सुला फेस्टला जोरदार प्रतिसाद
कलाकारांच्या इलेक्ट्रिफाईन सादरीकरणाला उपस्थितांकडून तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळतोय. संगीत आणि वाईनबरोबरच जिभेचे चोचले पुरविणाऱ्या वेगवेगळ्या अन्न पदार्थांची चव चाखण्याची संधी सुलाफेस्टने उपलब्ध करून दिलीय. पिझ्झा बर्गर, कबाब पासून मेक्सिकन, चायनीज, इटालियन, ग्रीक फुडच्या लज्जतदार डिशवर खावैये ताव मारत आहेत. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण एन्जॉय करत आनंदी होऊन माघारी जातोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या