नाशिक : नाशिकचे (Nashik) ठाकरे गटाचे (Thackeray Group) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच एसीबीकडून कंपनीत पदाचा गैरवापर केल्याने तक्रार दाखल केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा झालाय. 2016 साली बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला ठेका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरू होती. एकीकडे सलीम कुट्टा प्रकरणी चौकशी सुरु आहे. त्यातच आता बडगुज यांच्यावर एसीबीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान या प्रकरणानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया देखील समोर आलीये. यावेळी त्यांनी म्हटलं की, मला या संदर्भात माहिती नाही. पुढे काय करायचं ते कायदेशीर रित्या पाहून घेऊ. सध्या सलीम कुट्टा प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरु आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
एसीबीने दिलेल्या तक्रारीनुसार बडगुजर यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, फसवणूक आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2006 सालचे नाशिक महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रविण गेडाम यांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरुद्ध एसीबीकडे केलेल्या एका पत्राच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत समोर आल्यानुसार सुधाकर बडगुजर यांनी मे. बडगुजर अँड कंपनीतून डिसेंबर 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याबाबतची खोटी आणि बनावट कागदपत्रे बनवली.
त्यानंतर नाशिक महानगर पालिकेत सन 2007 पासून नगरसेवक आणि इतर पदे भूषवून बडगुजर अँड कंपनीस नाशिक महानगरपालिकेकडून विविध ठेके मिळवून दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच सन 2006 ते सन 2009 या कालावधीत 33 लाख 69 हजार 439 रुपये स्विकारुन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतला. त्यानंतर बडगुजर कंपनीचे भागीदार साहेबराव रामदास शिंदे आणि सुधाकर बडगुजर यांचे नातेवाईक सुरेश भिका चव्हाण यांच्यासोबत संगनमत करुन नाशिक महानगर पालिकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13 (1) (ड) (i)(ii), 13 (2) सह कलम 420, 467, 468, 471, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या तपासाला वेग आला असून त्यांचे पथक बडगुजर यांच्या सावता नगर परिसरातील घरी सायंकाळी दाखल होऊन घरझडती सुरू करण्यात आली. तसेच बडगुजर यांना उद्या चौकशीसाठी देखिल एसीबी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
नितेश राणेंचे आरोप
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला.
बडगुजरांनी आरोप फेटाळले
नितेश राणे यांनी योग्य माहिती न घेता आरोप केल्याचा दावा यावेळी बडगुजरांनी केलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे. दरम्यान या आरोपांवर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, ही जाणीवपूर्वक भेट झालेली नाही, कोणत्यातरी सार्वजनिक ठिकाणी आमची भेट झालेली असू शकते किंवा हा व्हिडिओ मॉर्फिंग देखील असू शकतो, आम्ही पोलिसांना सर्व प्रकराच्या चौकशीसाठी सहकार्य करु.