मालेगाव : शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मालेगावात (Malegaon News) मोठा धक्का बसला आहे. माजी महानगर प्रमुख रामा मिस्तरी (Rama Mistry) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Group) प्रवेश केला आहे. मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. 


काही दिवसांपूर्वी रामा मिस्तरी यांनी ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. शिवसेनेत मिस्तरी यांनी अनेक वर्षे मालेगाव महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मिस्तरी हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ठाकरे गटाने त्यांना तालुकाप्रमुख केले होते.


अद्वय हिरेंवर जोरदार हल्लाबोल


त्यानंतर ठाकरे गटाने अचानक मिस्तरी यांच्याकडील पद काढून जितेंद्र देसले यांना दिले होते. यामुळे मिस्तरी आणि समर्थकांमधील नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन मिस्तरी यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता आपले पद काढून घेण्यात आले असून त्यास हिरे हे जबाबदार असल्याचा आरोप मिस्तरी यांनी केला. काही दिवस पक्षापासून अलिप्त राहिलेले बंडू बच्छाव यांना गेल्या महिन्यात आपण संजय राऊत यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर बच्छाव सक्रिय झाल्याने मालेगाव बाह्य मतदार संघात उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार झाले. त्याचा हिरे यांना राग आला असावा आणि त्यातून त्यांनी आपल्याला पदावरुन काढण्यासाठी षडयंत्र रचले, असेही मिस्तरी यांनी म्हटले होते.


रामा मिस्तरी यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश 


यानंतर सोमवारी रामा मिस्तरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला. श्रीकांत शिंदे यांनी भगवा ध्वज खांद्यावर देत रामा मिस्तरी यांचे स्वागत केले. रामा मिस्तरी हे निष्ठावान शिवसैनिकांपैकी एक होते. त्यांनी मालेगाव महानगर प्रमुख पद गेले कित्येक वर्ष सांभाळले होते. 35 वर्षापासून ते शिवसेना (ठाकरे) पक्षात एकनिष्ठ होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. रामा मिस्तरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मालेगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  


आणखी वाचा 


Nashik Crime News : मालेगावात 'चड्डी बनियान' गँगचा धुमाकूळ, एकामागे एक सहा दुकानं फोडली, शहरात खळबळ