Nashik MD Drugs नाशिक :  ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उध्वस्त केला होता. त्यानंतर सोलापूर, संभाजीनगर, पालघर, पुणेसह अनेक जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकत एम डी ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत कोट्यवधींचा माल हस्तगत केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याच्या पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एमडी ड्रग्ज (MD Drugs) सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


नाशिकच्या (Nashik Crime News) पाथर्डी शिवारात गुन्हे शाखा युनिट एकने दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची 20 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर हस्तगत करण्यात आली आहे. निखिल पगारे आणि कुणाल घोडेराज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नाशिकला अजूनही एमडी ड्रग्सचा (Nashik MD Drugs Case) विळखा कायम असल्याचे दिसून येते.


पोलिसांकडून चौकशी सुरु


हे दोन जण एमडी कोणाला विक्री करणार होते? त्यांच्याकडे एमडी कुठून आले? त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा सध्या पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.  


नाशिकला दोन कारखाने उद्‌ध्वस्त


नाशिक रोडच्या शिंदेगावात एकापाठोपाठ एक असे दोन एमडी ड्रग्ज बनविण्याचे कारखाने उघडकीस आले. पहिला कारखाना मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी तर, दुसरा नाशिक पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला होता. याआधी नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने तब्बल 12 ड्रग्ज पेडलरला अटक केली होती.


ललित पाटीलला तामिळनाडूतून अटक


ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. पुणे पोलिसांनी सुरुवातीला ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना उत्तर प्रदेश येथून अटक केली होती. त्या नंतर प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली.


ललित पाटील प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप


ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. ससून रुग्णालय प्रशासनालाही धारेवर धरण्यात आले होते.


आणखी वाचा


Who Is Suraj Chavan : युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा कणा ते ठाकरे गटाच्या सचिवपदाची धुरा; खिचडी घोटाळ्यात अटक झालेले सूरज चव्हाण कोण?