Shantigiri Maharaj नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व विशेष वाढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) वारे आता सर्वत्र वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहेत. नाशिकमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.


नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले जयबाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख तसेच वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. 


2009 सालीही लढवली होती लोकसभेची निवडणूक


शांतीगिरी महाराज यांनी या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष लोकसभेची निवडणूक लढविली होती. यावेळी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासमोर आव्हान ठेवले होते. यानंतर महाराज सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिले.


शांतीगिरीजी महाराजांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क


शांतीगिरीजी महाराजांचा छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये मोठा भक्तपरिवार आहे. नुकतेच महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे धार्मिक अनुष्ठान पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तपरिवार उपस्थित होता. नाशिक (Nashik) जिल्ह्यात बाबांचा भक्तपरिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे. 


पंतप्रधान मोदी-शांतिगिरी महाराज यांचा फोटो व्हायरल


काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि शांतिगिरी महाराजांचा एक फोटो व्हायरल होत आहे. नाशिक येथे रामकुंडावर (Ramkund) गोदापूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी शांतीगिरी महाराजांना भेटले होते. या फोटोमध्ये लोकसभेच्या तयारीला लागा, असा संदेश पंतप्रधान मोदींकडून देण्यात आल्याचा उल्लेख फोटो कॅप्शनमध्ये करण्यात आल्याचे चर्चांना उधाण आले आहे.


आज करणार भूमिका स्पष्ट


आता लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाराज आपली भूमिका आज स्पष्ट करणार असून, यासाठी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत आज शांतीगिरी महाराज काय बोलणार? ते नाशिकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


कोण आहेत शांतीगिरी महाराज?


शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत, 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. या आधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करतात. 


इतर महत्वाच्या बातम्या


Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार


Raj Thackeray : गुरुवारपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; म्हणाले, "तयारीला लागा मी येतोय"