Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक मोठा ट्विस्ट आला आहे. अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांना अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. यावरून आता शांतीगिरी महाराजांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.    


शांतीगिरी महाराज म्हणाले की, आमच्या लोकसभेच्या मंडळींनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निर्णय जनता जनार्दन व लोकसभा कमिटीच्या मार्फत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे. हा निर्णय आमच्या लोकसभा कमिटीने घेतला आहे. 


आमचे सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेने ऐकून घेतले


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. आमचे सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेने ऐकून घेतले. मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर करू असे त्यांनी आम्हाला सांगितले होते. उमेदवारीबाबत भगवंताची इच्छा आहे, असे आम्ही समजतो. प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे. त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील, असे त्यांनी म्हटले आहे. 


या वेळेला लढायचं आणि जिंकायचं


आम्ही महायुतीचे उमेदवार या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला आहे. या वेळेला लढायचं आणि जिंकायचं, असे ठरवले आहे. आमच्या भक्त परिवाराने परस्पर चर्चा केली आहे. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पक्षाच्या एबी फॉर्मबाबत आमचे वकील आणि भक्त परिवार निर्णय घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, योग्य तो निर्णय घेऊ. निवडणुकीबाबत आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 


शांतीगिरी महाराजच महायुतीचे उमेदवार? 


दरम्यान, शांतीगिरी महाराजांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकमधून पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवरचा दावा अद्याप सोडलेला नाही. आता नाशिकमधून शांतीगिरी महाराजच महायुतीचे उमेदवार असणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Aniket Shastri : भाजपकडून मलाच उमेदवारी! नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा कायम, उमेदवारी अर्जही घेतला