नाशिक : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Muder Case) सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी या प्रकरणात खळबळजनक दावा केलाय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे मुक्कामाला होते. 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच दिंडोरीतील आश्रमात मागच्या वर्षी काही चुकीचे प्रकार घडत होते. त्याबाबत जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती. या बैठकीला आण्णासाहेब मोरे (Annasaheb More) यांचे पुत्र चंद्रकांत मोरे (Chandrakant More) उपस्थित होते. यावेळी वाल्मिक कराडने मध्यस्थी केल्यानं त्याचे हेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात आश्रय दिला असावा, असा आरोप देखील त्यांनी केलाय. आता यावर दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राच्या (Dindori Swami Samarth Kendra) प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे म्हणाले की, सीआयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले. त्यात वाल्मिक कराड 16 तारखेला दर्शनासाठी आले आणि निघून गेलेत. दत्तजयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये कोण आले हे आम्हाला माहिती नव्हते. पोलिसांची टेक्निकल टीम होती. त्यांनी तेवढे सीसीटीव्ही चेक केले. त्यात विष्णू चाटे नव्हते, असे पोलीस तपासात दिसून आले आहे. वाल्मिक कराड एकटा आला आणि निघून गेला, किती वाजता आले, याबाबतीत आम्हाला माहिती नाही. पोलिसांकडे सर्व रेकॉर्ड आहेत, त्यांना माहिती देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
चौकशीसाठी सामोरं जाण्यास तयार
तृप्ती देसाई यांनी आमच्याकडे महिलांनी तक्रारी दिल्या आहेत त्यांनी दिंडोरीचे प्रमुख आण्णासाहेब मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, असे म्हटले. याबाबतही आबासाहेब मोरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, तृप्ती देसाई यांनी लैगिक अत्याचार केल्याचे आरोप केले, त्यात काही तथ्य नाही. लोकशाही आहे, कोणी काहीही बोलू शकते. मागे आमच्या एका सेवेकरीबाबत तक्रार होती. पण, त्यानंतर तक्रारदाराने माफी मागितली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. आम्ही आमच्या उपक्रमात असतो. आमच्या संस्थेच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, आम्ही कोणत्याही चौकशीसाठी सामोरं जाण्यास तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा