नाशिक : एखाद्या दुचाकीमधील पेट्रोल संपलं की माणुकसीच्या भावनेतून दुसरा दुचाकीस्वार त्याला मदत करतो. अनेकदा रस्त्यावर, गावात, शहरात दुचाकीला पायाने धक्का देत दुसरा दुचाकीस्वार पेट्रोल पंपापर्यंत किंवा इच्छित स्थळापर्यंत पोहोचवतानाचे चित्र आपण पाहिले आहे. मात्र, चक्क बसमधील (Bus) वाहकाने आपला पाय बाहेर काढून एखाद्या रिक्षाला दे धक्का करत माणुसकी दाखवल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ही माणुसकी होती की स्टंट असाही प्रश्न अनेकांना पडला. मात्र, या व्हिडिओतून बसच्या वाहकाने स्वत:च्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याची तक्रारही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यानंतर, संबंधितांवर कारवाई करण्यात आलीय.
चालत्या बसच्या दारात उभे राहून रिक्षाला धक्का मारण्याची स्टंटबाजी सिटीलिंक बसच्या वाहक-चालकाच्या चांगलीच अंगलट आली असून दोघानाही निलंबित करण्यात आले आहे. नाशिकमधील बस आणि रिक्षाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिवहन विभागाने संबंधित सिटीलिंक बसच्या चालक-वाहकावर कारवाई केली आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये बसमधील वाहक बसच्या फुटस्टेपवर एक पाय ठेऊन उभा असून दुसऱ्या पायाने रिक्षाला टोचन देत असल्याचे दिसून येते. एक पाय व एक हात रिक्षावाल्याच्या मदतीसाठी लावल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सिटीलिंक बसच्या दरवाजात उभे राहून पायाने एका रिक्षाला धक्का मारण्याचा प्रताप बसच्या वाहकाने केला. बसमधील वाहकाने भर रस्त्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुकीच्या भावनेतून रिक्षाला धक्का मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिटीलिंकच्या कारभाराबाबत टीका सुरू झाली. सोशल मीडियावर काहींना बसचालकाचे कौतुकही केले, रिक्षावाल्यासाठी माणूसकी दाखवल्याचंही काहींनी म्हटलं. मात्र, बसमधील प्रवाशांसह स्वत:च्या जीवाशी खेळ होत असल्याच्या कमेंटही नेटीझन्सने केल्या. मागील आठवड्यातच सिटीलिंक प्रशासनाने पोलिसांनी पत्र लिहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, भरधाव बस चालविणाऱ्याचे व्हिडीओ मागविले असतानाच हा प्रकार उघडकीस आल्यानं तत्काळ संबंधित बसचालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता, या घटनेची सविस्तर चौकशी देखील होणार आहे.