Sanjay Raut नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विरोधात भाजप आक्रमक झाली असून संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका


संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान निष्पक्ष निवडणुकांच्या तत्वाच्या विरोधात आहे हे उघड आहे. या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहे. अशा विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. निवडणूक आयोगाला आणि सबंधित अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा प्रक्षोभक भाषणांची पुनरावृती होणार नाही. याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे तक्रार अर्ज अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिले आहे.


संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नंदुरबार येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांना (Sharad Pawar) ऑफर दिली. काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत या, असे त्यांनी म्हटले. यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला स्वाभिमान सोडून आणि राष्ट्रहिताचा बळी देऊन कधीच नरेंद्र मोदींसोबत जाणार नाहीत. मोदींना आता त्यांचा पराभव दिसू लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मोदींना कधी घाबरणार नाहीत. जे घाबरणारे होते, ते मोदींसोबत गेले आहेत. शरद पवारांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील. मोदींची इमेज ही रुपयासारखी घसरत चालली आहे. मोदींनी शरद पवार यांना ऑफर दिली आहे. अशी ऑफर देणारी व्यक्ती बालबुद्धी असते. त्यामुळे यावरुन मोदींची बुद्धी लक्षात येते, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.


आणखी वाचा 


'फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री', दत्तात्रय भरणेंच्या व्हिडिओवरून राऊतांचा हल्लाबोल