नाशिक : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले. आता रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका एबीपी माझाही बोलताना स्पष्ट केली आहे. तेढ निर्माण होण्यासारखे मी काही बोललो नाही. दीड तासांचे प्रवचन होते. त्यातील मोजका भाग एडिट करण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे.
रामगिरी महाराज म्हणाले की, 177 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली आहे. 7 दिवसात 25 लाख भाविक हरीनाम सप्ताहात येऊन गेले आहेत. काल साडेतीनशे क्विंटल साबुदाणा, दीडशे क्विंटल भगरचा प्रसाद वाटण्यात आला. 10 हजार टाळकरी येथे मुक्कामी असतात. चार प्रहरात अडीच हजार टाळकरी टाळ वाजवतात. अखंड भजन करतात, स्वयंशिस्त असते. प्रत्येक वर्षी मंत्री येतात. मुख्यमंत्री आलेत त्यांनी मनोगत व्यक्त केले, वारकर्यांचे आशीर्वाद घेतले. सरला बेट दुर्गम स्थानात बेट आहे. तिथे रस्ते नव्हते ते आता पूर्णत्वास येत आहेत. साडेसात कोटींचा डोम उभारला जात आहे. त्यासाठी सरकारने निधी दिला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सरला बेटमध्ये रामगिरी महाराज कधी आलेत? असे विचारले असता ते म्हणाले की, 1992 मध्ये विद्यार्थी म्हणून मी येथे आलो. वारकरी संप्रदाय, शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आलो. मी तीन वर्ष अध्ययन केले. त्यानंतर नारायण गिरी महाराज यांनी गोदावरी तीरावर असणाऱ्या एका आश्रमात 1995 मध्ये पाठवले. 1995 ते 2009 पर्यंत आश्रम सांभाळला. 2009 मध्ये नारायणगिरी महाराजांचा समाधी सोहळा पार पडला. त्यानंतर आमची नियुक्ती झाली, असे त्यांनी म्हटले.
वादग्रस्त वक्तव्याबाबत नेमकं काय म्हणाले रामगिरी महाराज?
वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता रामगिरी महाराज म्हणाले की, तेढ निर्माण होण्यासारखे मी काही बोललो नाही. दीड तासांचे प्रवचन होते. त्यातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
न्यायालय जे आदेश देईल ते मान्य
तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते? असे विचारले असता रामगिरी महाराज म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आमचा विश्वास आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालय जे आदेश देईल ते मला मान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हिंदू मुस्लिमांनी एकत्र राहावं
तुमच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक शहरात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत विचारले असता रामगिरी महाराज म्हणाले की, तणाव योग्य नाही. तो कोणत्याही धर्माचा असो. राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी अराजक माजविणाऱ्यांवर अंकूश ठेवावा. दगडफेक आणि आंदोलन करणे योग्य नाही. हे टाळण्यासाठी हिंदू मुस्लिम मिळून एकत्र राहावे. मुस्लिम समाजाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, संभाजीनगरातील परिस्थिती नियंत्रणात