Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असून संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. अशातच, ज्या रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच रामगिरी महाजारांची शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. दरम्यान, नाशिकच्या सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली.


रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट 


मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रामगिरी महाराजांची भेट राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. पण मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांची सिन्नरमध्ये जात भेट घेतली. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांचा उल्लेख संत असा केला. दुसरीकडे, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रामगिरी महाराजांना वाकून नमस्कार केला. तर सुजय विखे पाटील यांनी रामगिरी महाराजांसमोर साष्टांग दंडवत घातलं. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 


संभाजीनगरसह, नाशकात तणावपूर्ण शांतता 


वैजापूर शहरात 15 ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला. विशिष्ट समाजाचा मोठा जमाव अचानक डॉ. आंबेडकर चौकात जमला आणि घोषणाबाजी सुरू केली. रात्री आठपासून जमावानं चौकात ठाण मांडलं होतं. या वेळी जमलेल्या जमावानं कारवाईची मागणी केली. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यानं तणाव निवळला. सध्या  शहरात तणावपूर्व शांतता आहे.


नाशिकच्या येवला आणि मनमाडमध्ये पडसाद


प्रेषित महंमद पैगंबर यांचेविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गंगागिरी संस्थान गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुस्लिम समाजाने आरोप केला आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने नाशिकच्या येवला आणि मनमाड शहरात काल मध्यरात्री त्याचे पडसाद उमटले होते, मुस्लिम बांधवांनी येवला आणि मनमाड येथील पोलीस स्थानकातच ठिय्या मांडत महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती, अखेर महंत रामगिरी यांचेवर येवला शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महंत रामगिरी यांचा सिन्नर येथे नारळी सप्ताह सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज या सप्ताहाला भेट देण्यासाठी येत आहे.