नाशिक : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिकमध्ये दाखल झाले असून ते उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. राज ठाकरेंनी विधानसभेसाठी खास रणनीती आखली असून तर मनसे नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे.
मनसेची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक तीन आमदार नाशिकमधून निवडून आले होते. त्यामुळे नाशिक (Nashik News) हा मनसेचा बालेकिल्ला बनला होता. नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार अशी भक्कम स्थिती मनसेची होती. मात्र, गटबाजीमुळे मनसेला मोठा धक्का बसला आणि मनसेचा नाशिकची सत्ता गेली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे.
राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा
राज ठाकरे शनिवारी ओझर विमानतळावर (Ozar Airport) दाखल झाल्यावर प्रथम त्यांनी सहकुटूंब श्री सप्तश्रृंगी देवीचे (Saptashrungi Gad) दर्शन घेतले. त्यानंतर रात्री राज ठाकरे शहरात दाखल झाले. रविवारी ठरल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जागांचा आढावा घेतला.राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सविस्तर माहिती जाणून घेतली.
शहरातील मतदारसंघांवर राज ठाकरे उमेदवार देणार
राज ठाकरेंनी इच्छुकांना तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत. मात्र उमेदवार कोण? यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी विलंब लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर मनसे उमेदवारांची यादी घोषित करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरे सुरू करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी इच्छुकांना दिल्या आहेत. नाशिकमध्ये प्रबळ उमेदवार आणि निवडून येण्याची शक्यता अशाच जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून नाशिकमध्ये शहरातील नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि देवळाली या चारही जागेवर मनसे निवडणूक लढणार असल्याचे समजते. आता या मतदारसंघातून राज ठाकरे नक्की कुणाला उमेदवारी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या