Narendra Modi in Nashik नाशिक : यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकची निवड करण्यात आली आहे. या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 12 जानेवारी रोजी नाशिकला (Nashik) तपोवन येथील मैदानावर उद्घाटनासाठी येणार आहेत. नाशिकला पंतप्रधान मोदी यांनी कांदा (Onion) प्रश्नी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाला वेळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  


शिष्टमंडळाला पंतप्रधान मोदींनी वेळ द्यावा अशा मागणीचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandip Karnik) यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर गुरुवारी विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी कांदा उत्पादकांना भेटीसाठी वेळ देणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


नेमकं काय म्हटलंय पत्रात?


पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे. यावेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावरील काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची समक्ष भेट घेण्याची इच्छा आहे. केंद्रात कोणतेही सरकार असले तरी कांदा दरात वाढ झाल्यानंतर निर्यातबंदीसारखे निर्णय घेवून दर नियंत्रित ठेवत असते. या निर्णयामुळे ग्राहकांचे हित जपले जाते. मात्र कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. 


कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा


कांदा उत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने कोरडवाहू शेती करतो. कांदा हे त्याचे एकमेव नगदी पीक आहे. या पिकाच्या किमतीवर सातत्याने नियंत्रण ठेवल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरुन येत नाही. सरकारच्या धोरणामुळे सातत्याने होत असलेले कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आदी बाबी थेट पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलावे, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत आहे. 


पंतप्रधान मोदी नक्कीच तोडगा काढतील


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत या देशातील अनेक जटील प्रश्न सहजपणे सोडविले आहेत. कांदा प्रश्न त्या तुलनेत सोपा आहे. या चर्चेतून पंतप्रधान मोदी निश्चितपणे या प्रश्नावर तोडगा काढतील, अशी अपेक्षा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने व्यक्त केली आहे. 


आणखी वाचा


PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उतरणार नाशिकच्या रस्त्यावर; 12 जानेवारीला भव्य रोड शो