Nashik News : राष्ट्रपती पोलीस पदकांची (President's Police Medal) आज (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात नाशिकच्या (Nashik) मध्यवर्ती गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राजाराम कडनोर यांना देखील राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. 


देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात नाशिकच्या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. नाशिक शहर पोलीस सेवेतील दत्तात्रय राजाराम कडनोर राष्ट्रपती पदक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कडनोर पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जून 1991 साली रुजू झाले आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबईनाका पोलीस स्टेशन व मध्यवर्ती गुन्हेशाखा येथे नोकरी करीत असतांना त्यांनी खुन, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्हयांची उकल करून तपासकामी मदत केली आहे. 


दरम्यान नाशिकरोड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना 15 गावठी पिस्तोल हस्तगत केले आहेत. भद्रकाली पोलीस ठाणे येथे 65 मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या गुन्हयांच्या तपासांपैकी 12 गंभीर गुन्हयांत आरोपींना शिक्षा झालेली आहे. पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करीता सन 2017 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पदक व प्रशंसापत्र देवून सन्मानित केले आहे. पोलीस दलात कामगिरी करतांना अनेक गंभीर गुन्हयांची उकल, एम. पी.डी.ए. व मोक्का सारख्या कारवाया करून चैनस्नॅचिंग, मोटारसायकल चोरी या गुन्हयांत लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पोलीस दलातील एकुण सेवा 32 वर्षे 7 महिने पुर्ण केलेले असून त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी बद्दल 377 बक्षिसे व 35 प्रशंसापत्र मिळाले आहेत. 


कडनोर यांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापुर्ण सेवेची केंद्रशासनाने दखल घेवून दि. 26 जानेवारी 2023 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांचे कामगिरीचे कौतुक करून सत्कार केला आहे. तर उद्या प्रजासत्ताक दिनी शाहू स्टेडियमवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत आणि यादव यांना पदक देऊन गौरवण्यात येईल. 


कोणाकोणाला राष्ट्रपती पोलीस पदक?


राज्यातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.