Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) चुरस वाढत असून अवघे काही दिवस मतदानाला शिल्लक आहेत. तर 2 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. नाशिक शहराजवळील सैय्यद पिंपरी येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यासाठीची इव्हीएम स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. 


नाशिक (Nashik) जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे गोदाम सय्यद पिंपरी (Sayyad Pimpri) येथे उभारले आहे. याच गोदामात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सय्यद प्रिंप्री येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.


दरम्यान यावर्षी प्रथमच जिल्हा निवडणूक शाखेच्या सैय्यद पिंपरी येथील नुतन गोदामात मतमोजणी होणार आहे. या गोदामात दोन मोठे हॉल, इव्हीएम स्ट्रॉंग रूम, निवडणूक निरीक्षक केबिनसह कर्मचाऱ्यांसाठी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गमे यांनी मतमोजणी केंद्रावर सर्व साहित्य उत्तम दर्जाचे असावे. गुणतत्तापूर्ण कामे करण्यात यावीत. अधिकारी- कर्मचारी यांची भोजन, बैठक व्यवस्था उत्तम असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. 


मतदानासाठी मतदारांकडे ही कागदपत्रे आवश्यक 


नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी,2023 रोजी होणार आहे. या द्विवार्षिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.


हे पुरावे असणार ग्राह्य


आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.



विधानपरिषद निवडणूक; मद्यविक्रीस मनाई... 


महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत तशा सूचना दिल्या आहेत. मतदान 30 जानेवारी 2023 रोजी पदवीधर मतदार संघासाठी मतदान होणार आहे. नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे बंधनकारक असणार आहे.