Pankaj Bhujbal मालेगाव : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुत्र पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) हे आज गुरुवारी मालेगाव तालुक्यातील मांजरे, कौळाणे, नगाव, टाकळी, वऱ्हाणे आदी गावांच्या दौऱ्यावर होते. मात्र यावेळी मालेगाव तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. पंकज भुजबळांचा दौरा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आला. 


पंकज भुजबळ यांचा दौरा अडवून भुजबळांच्या विरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा संपत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबीयांना फिरकू देणार नाही, असे कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे मालेगाव तालुका दौऱ्यातून पंकज भुजबळ यांनी माघारी फिरण्याची वेळ आली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मराठा आंदोलक शांत झाल्याचे दिसून आले.


मनोज जरांगे मारुतीचे शेपूट, तो कधीच थांबणार नाही - छगन भुजबळ


दरम्यान, मराठा आरक्षणावरुन (maratha reservation) छगन भुजबळ आणि मनोज जरांगे (manoj jarange) यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. आज छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला आहे. एकमताने या कायदाला मान्यता देण्यात आली. पण मनोज जरांगे यांना हा कायदा मान्य नाही. ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की, हे मारुतीचे शेपूट असून कधीच संपणार नाही. एकामागून एक मागण्या त्यांच्याकडून पुढे केल्या जातात. जरांगेंना कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही. माझी मराठा समाजाला विनंती आहे की, सरकार हळूहळू आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे जरांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो कधीही थांबणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 


...तर त्याची जबाबदारी मनोज जरांगेंवर टाकावी - छगन भुजबळ 


मनोज जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसविण्यास सांगणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. वयोवृद्धांना व्याधी असू शकतात. ते उपोषणाला बसल्यानंतर काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? उपोषणामुळे कुणी दगावले, तर याची जबाबदारी मनोज जरांगेंवर टाकावी. जर कुणी मृत्यूमुखी पडले, तर जरांगेंवर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. 


आणखी वाचा 


Pankaja Munde : प्रितम मुंडे मैदानात उतरणार की नाही, बीड लोकसभा कोण लढवणार? पंकजा म्हणाल्या, दिल्लीतून उमेदवार ठरेल